म्हसळा : दिघी पोर्टमधील अवजड माल वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्था करण्याऐवजी म्हसळा शहरातील नागरी वाहतुकीच्या रस्त्याचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पोर्टचे प्रशासनाकडून माल वाहतुकीच्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
एकमार्गी असलेल्या रस्त्यावर दररोज पोर्टचे सुमारे २०० ते ३०० कोळसा वाहतुकीचे ट्रक, स्टीलकॉइल वाहतुकीचे ट्रेला आणि फर्निस व अन्य आॅइलचे टँकर भरधाव वेगाने धावतच असतात. पोर्टच्या या अवजड वाहतुकीने शहरातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. सर्वत्र धुरलाच धुरळा झाला आहे. त्यामुळे घरादारात, दुकानांत धुळीचा लोळ शिरतो आहे. लहानांपासून मोठ्या माणसाला धुळीच्या त्रासाने वेगवेगळे आजार जडत आहेत.
सर्दी, खोकला, अस्थमा, डोळ्यांंचे विकार आणि हृदयविकार असलेल्यांना पोर्टच्या वाहतुकीने बेजार करून सोडले आहे. दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीविरोधात स्थानिकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. तर पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, ती तात्पुरती असल्याने परिस्थिती पुन्हा जैसे थे होते.
पोर्टवर निगडित आर्थिक व्यवसाय करणारे जनतेची होणारी दशा लांबूनच पाहत आहेत. दिघी पोर्ट वाहतुकीसाठी नवीन होत असलेला दिघी-पुणे मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे म्हसळा शहरातील रस्त्याला कोणी वाली राहिलेला नाही, असे निदर्शनास येत आहे. सदरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्यात असला तरी संबंधित अधिकारी शासनाच्या निदर्शनास आणून देत नाही आणि स्वत:ही लक्ष देत नाहीत, असेच चित्र आहे.
दिघी पोर्ट म्हसळा शहरातील रस्त्याचा वापर त्यांचे खासगी व्यवसायासाठी करीत आहे. मात्र, त्याची दुरु स्ती करून देत नाही. काही दिवसांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीने दिघी पोर्टने सकलप मार्गे तोंडसुरे पर्यायी मार्गाचा प्रश्न सोडवला. तर न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा ते दिघीरोड दोन किमीचा रस्ता म्हसळा नगर पंचायतीकडेच येण्याची शक्यता आहे.