दिघी-पुणे महामार्गाची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:05 AM2020-02-18T00:05:35+5:302020-02-18T00:05:55+5:30

वेळास ते दिघी बंदर रस्त्याची दुरवस्था : ठिकठिकाणी खड्डे पडल्याने प्रवास खडतर

Dighi-Pune Highway Daina | दिघी-पुणे महामार्गाची दैना

दिघी-पुणे महामार्गाची दैना

googlenewsNext

गणेश प्रभाळे 

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास ते दिघी बंदर या रस्त्याची फार मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दिघी बंदरातील अवजड वाहतूक होत असल्याने पसरलेल्या दगड, मातीमुळे दिघी - माणगाव - पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे. या मार्गावर आता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे नियंत्रण आहे. मात्र, रस्ता नूतनीकरणाच्या नावाने दुर्लक्षित होत असल्याने येथील खड्ड्यांनीच प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

दिल्ली-मुंबई कॉरिडोर प्रकल्पांतर्गत तयार होत असलेल्या दिघी पोर्टला जोडणारा रस्ता गेल्या चार वर्षांपासून जे. एम. म्हात्रे या कंत्राटदाराने बांधण्यास घेतला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होता. राष्ट्रीय महामार्ग बनल्यानंतर हा रस्ता एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला. रस्ता आहे त्या अवस्थेत वर्ग झाल्याने, रस्ता बनविण्याच्या खर्चात नवीन रस्त्याचे काम करायचे की आहे त्या रस्त्याची मलमपट्टी करायची, असा प्रश्न कंत्राटदारांसमोर आहे. मध्यंतरी वनविभागाकडून मान्यतेच्या तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे कारण पुढे येत होते. मात्र, कंत्राटदारचे ढिसाळ नियोजन व लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचे दुर्लक्ष यामुळे रस्त्याचे काम आजही अर्धवट आहे. यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे. सद्य:स्थितीत रस्त्याचे काम न केल्याने रस्ता धोकादायक बनत आहे. यामुळे रस्त्याबाबत त्रासलेल्या प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या आठ - दहा वर्षांपासून वेळास ते दिघी बंदर रस्त्यावरून दिघी पोर्टकडील कोळसा व कॉइल वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करायला पाहिजे होती. कायमस्वरूपी दुर्लक्ष झाल्याने वाहनचालकांना खड्ड्यातून मार्ग काढताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. वेळास फरशी ते भरणा हा रस्ता जास्तच खड्डेमय झाला आहे. तरी रस्त्याच्या सध्याच्या परिस्थितीनुसार दुरुस्तीकडे श्रीवर्धन तालुका लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

१दिघी व राजपुरी येथून जंजिरा व अलिबागकडे शेकडो स्थानिक प्रवासी व पर्यटक जात असतात. त्यात काही दुचाकींवर वृद्ध, महिला व बालकांचादेखील समावेश असतो. श्रीवर्धन किंवा पलीकडील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवासी याच मार्गाने जाऊन फेरी बोट अथवा जंगलजेट्टीमधून पुढचा प्रवास करतात.
२वेळास फरशी येथून प्रवास करताना भरणे घाट या सहा किलोमीटर अंतरावरील प्रवासात रस्त्यावर पसरलेली खडी व मोठमोठे दगड आणि मातीतून प्रवास करणे म्हणजे पर्यटन ठिकाणावरील सुखकर वाटणारा हा प्रवास प्रवाशांचा अंत पाहणारा ठरू लागला आहे. या रस्त्यावर कोणतीच डागडुजी केलेली नसल्याने घाट चढण्यास व उतरण्यास वाहनचालकांना त्रास होतो.
३स्थानिक मिनीडोर चालक इतरांना या त्रासातून वाचवण्यासाठी मदत करतात. मात्र, रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असल्याने मानवी आधारदेखील कुचकामी ठरतो.
४बऱ्याच वेळा या रस्त्यावरून दुचाकीस्वार पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

रस्ता नूतनीकरण ज्या वेळी होईल त्या वेळी होईल. मात्र, सध्या रस्त्याची दुरुस्ती झाल्यास तात्पुरता प्रवास सोयीचा होईल. शिवाय दुर्घटनादेखील टाळता येऊ शकतील.
- हेमंत कीर, प्रवासी

म्हसळा बायपास येथून खड्डे दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. दिघीपर्यंतचे रस्त्यातील खड्डे भरायचे नियोजन आहे. या दोन दिवसांत वेळास येथील रस्त्याची दुरुस्ती होईल.
- सचिन निफाडे, उपअभियंता
 

Web Title: Dighi-Pune Highway Daina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड