लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: रायगड पोलिस दलातील भरती प्रक्रियेत गतवर्षी बोगस प्रमाणपत्र दाखल करून भरती होणारे प्रकरण उघडकीस आले असताना याही वर्षी पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी डिजिटल अर्थात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसद्वारे कॉपी करणाऱ्या ६ उमेदवारांना अलिबाग व पेण येथून ताब्यात घेतले. यापैकी चौघे बीडचे, तर उर्वरित दाेेघे संभाजीनगर, जालन्याचे आहेत.
रायगड पोलिस दलात पोलिस शिपाई पदाच्या ४२२ जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे. कागदपत्र पडताळणी, शारीरिक क्षमता चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची अलिबाग व पेण येथील ११ केंद्रांवर लेखी परीक्षेचे नियाेजन केले हाेते. परीक्षेला चार हजार ७४७ उमेदवार बसले होते. पोलिसांनी लेखी परीक्षेच्या अनुषंगाने विशेष काळजी घेतली होती. कॉपी रोखण्यासाठी केंद्राबाहेर हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टरचा वापर केला हाेता. असे असताना ६ जणांनी परीक्षा केंद्रात इलेक्ट्राॅनिक डिव्हाइस घेऊन गेले. परीक्षा सुरू असताना पाेलिसांना काॅपी सुरू असल्याचे लक्षात आले.
या उमेदवारांविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. डिव्हाइसवरून उमेदवारांना काॅपी पुरवणाऱ्यांचाही शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
ताब्यात घेतलेले आरोपी
काॅपी करणाऱ्या रामदास जनार्दन ढवले (२३, रा. नाळवंडी, जि. बीड), दत्ता सुभाष ढेंबरे (२२, रा. मौजवाडी, जि. बीड), ईश्वर रतन जाधव (२१, रा. चांभारवाडी, जि. जालना), गोरख गंगाधर गडदे (२४, रा. राक्षसवाडी, जि. बीड), सागर धरमसिंग जोनवाल (२०, रा. वडझडी, जि. औरंगाबाद), शुभम बाबासाहेब कोरडे (२७, जि. बीड) यांना ताब्यात घेतले आहे.