लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: सलग सुट्ट्यांमुळे रायगडमध्ये गुरुवारपासून मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. रविवारी परतीच्या मार्गावर मात्र ते चांगलेच अडकले. जलवाहतूक बंद केल्यामुळे पर्यटकांना अलिबाग एसटी स्थानकावर अडकून पडावे लागले, तर नेरळ माथेरान घाटात वाहतूककोंडी झाल्यामुळे पर्यटकांची चांगलीच पंचायत झाली. मुंबई गोवा महामार्गावरही वाहतूककोंडी झाली होती.
गुरुवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी आणि सलग शनिवार, रविवार सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक रायगडमध्ये आले होते. तीन दिवस मौजमजा केल्यानंतर पर्यटक रविवारी दुपारनंतर परत निघाले होते. मात्र, अलिबाग येथून जलवाहतूक बंद होती. त्यामुळे सर्व लोंढा एसटी स्थानकावर गेला. मात्र, अचानक प्रवासी वाढल्याने एसटी सेवाही कोलमडली होती. त्यामुळे पर्यटकांना तेथे अडकून पडावे लागले.
पालीतही भाविक अडकले- रविवारी मोठ्या संख्येने भाविक पालीत अष्टविनायक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. मात्र, ते वाहतूककोंडीत अडकले. पर्यटक व भाविकांच्या गाड्यांमुळे पालीत वाहतूककोंडी होत आहे. पाली पोलिस व देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी अथक प्रयत्न करीत भाविकांना यातून मार्ग काढून दिला.
कोलाड नाका येथे लांबच लांब रांगा- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आंबेवाडी कोलाड नाका येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पुई गावापासून आंबेवाडी कोलाड नाका येथे चौपदरीकरणाचे काम अर्धवट स्थितीत असल्याने ही वाहतूककोंडी होत आहे.
कशेडी घाटात वाहतूककोंडी- शनिवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहने कशेडी बोगद्याकडे मार्गस्थ होत असताना व दोन्ही बाजूने वाहने एकत्र आल्याने, तसेच अवजड वाहनांमुळे कशेडी बोगद्यापासून भोगाव फाटापर्यंत वाहतूककोंडी झाली होती. तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अडीच किलोमीटरपर्यंत रांगा
- माथेरानच्या दस्तुरा नाका येथील वाहनतळ वाहनांनी भरून गेल्याने रविवारी पर्यटक वाहन चालकांची चांगलीच पंचाईत झाली.
- वाहनतळापासून माथेरान घाटात अडीच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली होती.
- पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर ही कोंडी सोडवत पर्यटकांना दिलासा दिला.
- अरुंद घाट रस्ता त्यात रस्त्यालगत वाहने उभी केल्याने घाटात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला.
- त्यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली. त्यात अनेक पर्यटक अडकून पडले होते.