कोकणच्या वाटेवर कोंडीचे काटे, मुंबई-गोवा मार्गावर गणेशभक्तांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 12:57 PM2024-09-07T12:57:39+5:302024-09-07T12:58:05+5:30
Mumbai Goa Highway Update: गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने मुंबई, ठाणे येथून कोकणातील गावी निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. रायगडमधील आमटेम, नागोठणे, इंदापूर आणि लोणारे या ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागल्या.
- राजेश भोस्तेकर
अलिबाग - गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने मुंबई, ठाणे येथून कोकणातील गावी निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. रायगडमधील आमटेम, नागोठणे, इंदापूर आणि लोणारे या ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागल्या.
मुंबई, ठाणे येथून तीन हजार एसटी बस कोकणात धावल्या. त्यांनाही वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली. यंदा माणगाव शहरात वाहतूककोंडीतून काहीशी प्रवाशांची सुटका झाली. माणगाव एसटी स्थानक तीन ठिकाणी केल्याने ही समस्या सुटली.
रेल्वे, एसटीपेक्षा दुचाकी बरी
गणेशोत्सवाला जाण्यासाठी चाकरमानी हे एसटी बस, रेल्वे, खासगी बस, कारने गावी जाण्यास निघाले. मात्र, काही चाकरमानी रेल्वे, बसने न जाता दुचाकीने सुसाट कोकणाच्या दिशेने जाताना मुंबई-गोवा महामार्गावर दिसत आहेत. कुटुंबासह बॅगा दुचाकीला बांधून निसर्गाचा आनंद घेत ते गावाकडे निघाले आहेत.
रेल्वे, एसटीपेक्षा दुचाकी बरी
गणेशोत्सवाला जाण्यासाठी चाकरमानी हे एसटी बस, रेल्वे, खासगी बस, कारने गावी जाण्यास निघाले. मात्र, काही चाकरमानी रेल्वे, बसने न जाता दुचाकीने सुसाट कोकणाच्या दिशेने जाताना मुंबई-गोवा महामार्गावर दिसत आहेत. कुटुंबासह बॅगा दुचाकीला बांधून निसर्गाचा आनंद घेत ते गावाकडे निघाले आहेत.
पोलिसांचा गणेशभक्तांना मदतीचा हात
मुंबई-गोवा महामार्गावर आमटेम गावाच्या आसपास कोकणात जाणारे चारचाकी वाहन हे रस्ता क्रॉस करताना वाहनाखाली दगड आल्याने अडचण निर्माण झाली होती. कारमध्ये महिला, मुले आणि पुरुष मंडळी प्रवास करीत होती. वाहनाखाली दगड अडकल्याने पुढे जाणे कठीण होते. अशावेळी पोलिस हवालदार प्रशांत देसाई आणि त्यांचे सहकारी यांनी गणेशभक्त कुटुंबाला मदत करून वाहनाखाली अडकलेला दगड काढण्यास मदत केली.