मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीए प्राधिकरण स्थापनेनंतर पहिल्याच झालेल्या दोन कामगार ट्र्स्टी पदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत जेएनपीटी कामगार संघटनेचे अध्यक्ष व कामगार ट्र्स्टी दिनेश पाटील पहिल्या क्रमांकांची (२९१ मते) मिळवित ट्र्स्टीपदी निवडून येण्याची हॅट्ट्रिक साधली आहे. तर जेएनपीटी वर्कर्स युनियनचे सरचिटणीस व माजी ट्र्स्टी रविंद्र पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची (१६१ मते) मिळवून जेएनपीए कामगार ट्र्स्टी पदाचा बहुमान पटकावला आहे.न्हावा-शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटनेचे सरचिटणीस व माजी ट्र्स्टी भुषण पाटील यांना कामगारांनी चांगलाच धक्का दिल्याने त्यांच्या बोटीला जेएनपीएचे बंदर गाठता आलेले नाही.त्यांना १४३ मते मिळाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
न्हावा-शेवा पोर्ट ॲण्ड जनरल वर्कर्स युनियनला अवघी ५१ मते मिळाली आहेत.एक मत ऑदरला मिळाले आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ऐवजी ॲथोरिटी ॲक्ट स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक मंगळवारी (१५) पार पडली.पहिल्यांदाच तीन वर्षांच्या कालावधीसाठी असलेल्या निवडणुकीत बंदरातील मान्यता प्राप्त चार कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. गुप्त मतदानाने झालेल्या निवडणुकीत ६५२ मतदारांपैकी ६४७ कामगारांनी मतदान केले. मतदानानंतर मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.६४७ मते मोजतानाही निवडणूक अधिकाऱ्यांना अडीच तासांहून अधिक वेळ लागला.त्यामुळे दिड वर्षांहून अधिक विलंबाने घेण्यात आलेल्या निवडणुकीच्या निकालालाही विलंबच झाला. मात्र मतमोजणी दरम्यान कामगारांनी प्रशासन भवन परिसरात चांगलीच गर्दी केली होती. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करीत आनंद साजरा केला.