खारेपाटातील शेतकऱ्यांचा थेट मार्केटिंगचा फंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:49 AM2018-12-09T00:49:55+5:302018-12-09T00:50:17+5:30
खारेपाटीतील तरुण शेतकऱ्यांनी ‘डायरेक्ट मार्केटिंग’ तंत्र स्वीकारून मत्स्यशेतीचा पर्याय स्वीकारला आहे
- जयंत धुळप
अलिबाग : खारेपाटीतील तरुण शेतकऱ्यांनी ‘डायरेक्ट मार्केटिंग’ तंत्र स्वीकारून मत्स्यशेतीचा पर्याय स्वीकारला आहे. खवय्ये पर्यटकांकडून मागणीही वाढली आहे. याशिवाय खारेपाटाची आगळी ओळख असणारा गोड चवीचा पांढरा कांदादेखील थेट मुंबई-पुण्याच्या मॉलमध्ये ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
‘गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते. खारेपाटातील शेतकºयांनी उधाणामुळे नापीक झालेल्या भातशेतीत भात, आंबा, तोंडली, पांढरा कांदा यांचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न चार पिढ्यांपासून चालविला आहे, तर गेल्या पाच-सहा वर्षांत येथील तरुण पिढी मत्स्यशेती करू लागली आहे, त्यामुळे आता खारेपाटातील शेतकºयांना सरकारी योजनांवर अवलंबून न राहता स्वबळावर नवा अर्थप्राप्तीचा स्रोत सुरू करण्यात यश आले आहे.
शहापूर-धेरंड परिसरातील जमीन रिलायन्स पॉवर प्रोजेक्टकरिता संपादित करण्याची प्रक्रिया ज्या वेळी सुरू झाली, त्या वेळी विरोध न करता, शहापूरमधील आदर्श मित्रमंडळाच्या तरुणांनी विरोध करण्याऐवजी तब्बल ६५ तलाव शहापूर-धेरंड गावात खोदून मत्स्य शेती सुरू केली. खारेपाटातील जिताडा माशाची मागणी वाढल्याने किमान ७०० रुपये किलो या दराने त्याची विक्री होऊ लागली. पर्यटकांच्या पसंतीस हा मासा उतरला.
याच परिस्थितीचा तरुण शेतकºयांनी अभ्यास करून गावातील जिताडा मासा क्षेत्र हा पर्यटनाचाच भाग बनवून टाकण्याचा निर्णय घेतला. शहापूर-धेरंड ही दोन्ही गावे पेण- वडखळ-अलिबाग मार्गावर पेझारी नाक्यावरून सुमार आठ कि.मी.वर आतल्या बाजूला आहेत. परिणामी, मुंबई-पुणे येथील पर्यटक वाट वाकडी करून गावात येणे कठीण तर शेततलावापर्यंत रस्ते नसल्याने तेथे पर्यटक पोहोचू शकत नाहीत, हे लक्षात घेऊ न तरुणांनी वडखळ-अलिबाग राज्यमार्गावर पळी येथे धाबा सुरू केल्याची माहिती आदर्श मित्रमंडळाचे सदस्य समीर पाटील यांनी दिली.
महिलांना रोजगार संधी
येत्या काही दिवसांत खारेपाटातील विशिष्ट चवीचा तांदूळ, मसाले, लोणची, वालदेखील तेथे विकण्याकरिता विक्री केंद्र सुरू करण्यात येणार असून, त्यातून महिलांना घरोघर रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अगोदर मागणी केल्यास मत्स्यशेतीतील मासेही मुंबई-पुणे येथील खवय्यांना उपलब्ध करून देण्याकरिता तरुणांचे नियोजन आहे.
अलिबागचा पांढरा कांदा मॉलमध्ये
खारेपाटातील गोड पांढरा कांदा हा त्याच्या औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध असून त्याला मोठी मागणी आहे. याचाच विचार करून यंदा अलिबागमधील पांढरा कांदा मुंबई, ठाणे आणि पुणे शहरातील मॉल्समध्ये पाठविण्यासाठी अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील सतीश म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तयारी सुरू केली आहे.
तीन एकर शेतजमिनीत पांढºया कांद्याची लागवड केली असून, सुमारे ३५ ते ४० टन उत्पादन अपेक्षित आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा पांढरा कांदा विक्रीकरिता मुंबई, पुणे व ठाणे येथील मोठ्या मॉल्समध्ये पाठविण्यात येणार आहे. लागवडीपासून उत्पादन मिळेपर्यंत खते, औषधे, मजूर आदीवरील सुमारे दोन लाखांचा खर्च वजा जाता, तीन ते चार लाख रुपयांपर्यंत नफा मिळणे अपेक्षित असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.