पोलिसांच्या मुलांसाठी पुण्यात शाळा, तर नागपुरात हॉस्टेल उभारणार, पोलीस महासंचालक सतीश माथुर यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 04:51 PM2018-06-01T16:51:36+5:302018-06-01T16:53:10+5:30
पोलिसांच्या पाल्यांसाठी पुणे येथे सीबीएससी बोर्डाच्या धर्तीवर शाळा सुरू करणार असून, नागपूर येथे पोलिसांच्या पाल्यासाठी हॉस्टेल उभारणार असल्याची घोषणा पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी शुक्रवारी येथे बोलताना केली आहे.
- जयंत धुळप
रायगड- पोलिसांच्या पाल्यांसाठी पुणे येथे सीबीएससी बोर्डाच्या धर्तीवर शाळा सुरू करणार असून, नागपूर येथे पोलिसांच्या पाल्यासाठी हॉस्टेल उभारणार असल्याची घोषणा पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी शुक्रवारी येथे बोलताना केली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात राबविण्यात येणा-या पोलीस कल्याण योजनेबाबत जागरूकता पोलीस कर्मचा-यांमध्ये निर्माण होण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये पोलीस महासंचालक माथुर यांच्या संकल्पनेने चालू वर्षाच्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पोलीस कल्याण सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयात पोलीस महासंचालक माथुर यांच्या हस्ते करण्यात आला.
पोलीस व कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेऊन दिली समाधानकारक उत्तरे
पोलीस महासंचालक माथुर यांनी रायगड जिल्हा पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी जाणून घेण्याकरिता दरबाराचे आयोजन केले होते. या दरबारामध्ये पोलीस व त्याच्या कुटुंबीयांनी मांडलेल्या समस्या व प्रश्न जाणून घेऊन माथुर यांनी पोलीस व त्यांचे कुटुंबीयांचे समाधान होईल, अशी उत्तरे दिली. पोलीस कर्मचा-यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र दर्शन प्रवास सवलतीच्या सहलीच्या गाडीला पोलीस महासंचालक माथुर यांनी हिरवा झेंडा दाखवून ती प्रवासाकरिता रवाना केली. रायगड पोलीस पेट्रोलपंपाचे उद्घाटन व पोलीस कल्याण निधी अंतर्गत राबविलेल्या योजना आणि उपक्रमासंदर्भातील पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी माथुर यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलीस कल्याणांतर्गत विविध उपक्रमांचे उद्धाटन
महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेनुसार महाराष्ट्र पोलीस कल्याण निधीची स्थापना करण्यात आली. पोलीस कल्याण निधीतील साधन-संपत्तीचा वापर पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी करण्यात येतो. त्याच अनुषंगाने रायगड जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबीयांसाठी सेवा, शिक्षण, आरोग्य आदी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण अनुदान, पुस्तक अनुदान, बिनव्याजी कर्ज, महाराष्ट्र दर्शन सहल, व्यवसाय मार्गदर्शन, नोकरी मेळावा, कौशल्य मेळावा, कुटुंब आरोग्य योजना, समाधान हेल्पलाइन, महिला पोषण आहार योजना, सबसिडी कँटिंग, पेट्रोलपंप इत्यादी कल्याणकारी योजनाचा समावेश करण्यात आला आहे.
कोकणातील सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांची उपस्थिती
कार्यक्रमास कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, रत्नागिरी पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, रायगडचे अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, पोलीस उप अधीक्षक दत्तात्रय निघोट तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे व शाखांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.