वंचित आघाडीचे राजकारण एका चुकीमुळे बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:15 PM2019-07-07T23:15:32+5:302019-07-07T23:15:42+5:30
जयंत पाटील यांची टीका : आघाडीत प्रकाश आंबेडकर सोबत राहणार नसल्याचे केले अधोरेखित
अलिबाग : वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण माने यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेली भूमिका योग्यच आहे. आघाडीचे तेच खरे नेते आहेत. इतर कोण आहेत ते आम्हाला माहिती नाही. वंचित बहुजन आघाडीचे राजकारण एका चुकीमुळे बिघडले आहे आणि ही चूक मानेच सुधारू शकतील असे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता आमदार पाटील यांनी टीका केली. तसेच लक्ष्मण माने यांनी सुद्धा विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे आगामी कालावधीतील विधानसभेच्या निवडणुका लढताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांच्या आघाडी सोबत प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी नसणार हेच आमदार पाटील आणि माने यांच्या वक्तव्याने अधोरेखित केल्याचे दिसून येते.
देशातील सध्याच्या राजकारणाने वेगळेच वळण घेतले आहे. सरकारचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाची अर्थव्यवस्थाही डबघाईला आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये देशातील सर्वात मोठा असलेला काँग्रेस पक्षही हतबल झाला आहे. यासाठी सर्व विरोधी पक्षाने एकजुटीने एकत्र आगामी निवडणुकांंना सामोरे जाण्याची गरज असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण माने यांंनी केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि लक्ष्मण माने यांच्यामध्ये सध्या राजकीय भूमिकेवरून बिनसले आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी माने यांनी वेगळा निर्णय घेतल्याने ते आंबेडकर यांच्या सोबत राहणार नसल्याचे बोेलले जाते.
पुरोगामी युवक संघटना आणि आमदार जयंत पाटील वाढदिवस अभीष्टचिंतन समितीच्यावतीने अलिबागमधील पीएनपी नाट्यगृह येथे युवा मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आमदार धैर्यशील पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठीच्या मुद्द्यावर निवडून आलेले मराठीला विसरले आहेत. मराठी भाषेच्या सक्तीसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. राज्यात मराठी भाषा सक्तीची करा असा ठराव विधिमंडळात मांडला आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळमध्ये त्यांच्या मातृभाषेची सक्ती आहे, तर महाराष्ट्रात मराठीची सक्ती का नाही, असा प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करा अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.