नेरळ : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात क्रांतिदिनापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र, शासनाने अद्याप त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नसल्याने २२ आॅगस्टपासून ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कर्जत तालुक्यात ग्रामसेवकही आंदोलनात सहभागी झाले असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे.
कर्जत तालुक्यात ५१ ग्रामपंचायती असून, काही ग्रामसेवकांना दोन ग्रामपंचायतींसाठी नियुक्त करण्यात आले आहे. ४० हून अधिक ग्रामसेवक कर्जत पंचायत समितीच्या अंतर्गत आहेत; परंतु कर्जत तालुक्यातही हे आंदोलन सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची कामे खोळंबली आहेत. ग्रामसेवक हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा दुवा आहेत. शासनाच्या विविध योजना ग्रामसेवकांमार्फत जनतेपर्यंत पोहोचविल्या जातात. मात्र, आज त्याच ग्रामसेवकांना प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे. आमच्या मागण्या रास्त असून शासनाने त्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेने केली आहे.ग्रामीण जनतेपर्यंत आम्ही अनेक योजना पोहोचवत असतो. त्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो. शासन ग्रामसेवकांच्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत मान्य करत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवणार आहोत.- प्रवीण पेमारे, अध्यक्ष,ग्रामसेवक युनियन, कर्जतआंदोलनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना त्रास व अडचण निर्माण झाली आहे. त्यांच्या गैरसोयीची जाणीव आहे. ग्रामसेवकांच्या मागण्याही रास्त आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार.- अशोक रौदळ,ग्रामसेवक, पोशीरग्रामसेवक ग्रामपंचायतीत येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. विकासकामे करतानाही अडचणी येत आहेत. ग्रामसेवक शासनाचा प्रतिनिधी असल्याने ग्रामसेवकाचे ग्रामपंचायतीत स्थान महत्त्वाचे आहे. गेले अनेक दिवस आंदोलनामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे.- चिंधू तरे, सरपंच, ग्रामपंचायत, दहीवली