सरकारी रुग्णालयात सुविधांची दाणादाण, एक्सरे प्लेट नसल्याने रुग्णांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 03:11 AM2018-03-13T03:11:47+5:302018-03-13T03:11:47+5:30

जिल्हा सरकारी रुग्णालयातील सोयी-सुविधांची दाणादाण उडाली आहे. एक्सरे काढण्यासाठी लागणा-या एक्सरे प्लेट नसल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे.

Disadvantages of facilities in government hospitals, absence of patients due to no X-ray plate | सरकारी रुग्णालयात सुविधांची दाणादाण, एक्सरे प्लेट नसल्याने रुग्णांची गैरसोय

सरकारी रुग्णालयात सुविधांची दाणादाण, एक्सरे प्लेट नसल्याने रुग्णांची गैरसोय

Next

आविष्कार देसाई 
अलिबाग : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयातील सोयी-सुविधांची दाणादाण उडाली आहे. एक्सरे काढण्यासाठी लागणा-या एक्सरे प्लेट नसल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे. फक्त नूतनीकरणावर सुमारे दहा कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या अंतर्गत रुग्णालयात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयातील आसन व्यवस्थेसाठी बसवण्यात आलेल्या खुर्च्याही मोडलेल्या अवस्थेत असल्याने दहा कोटी रुपये नेमके कोठे खर्च झालेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रायगड जिल्ह्याच्या अलिबाग या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा स्तरावरील रुग्णालय काँग्रेसच्या राजवटीमध्ये उभारण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांनी याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अत्याधुनिक अतिदक्षता विभाग सुरु केला होता. यासाठी लागणारी सर्व व्यवस्था, उपकरणे, सुविधा यांची पूर्तता त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी मोठ्या संख्येने जिल्हा सरकारी रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करुन दिला होता. कालांतराने या जिल्हा रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. नूतनीकरणावर तब्बल दहा कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात सरकारने मागे-पुढे पाहिले नाही. एवढ्या मोठ्या निधीमध्ये नव्याने रुग्णालयाची इमारत उभी राहिली असती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सरकारने मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला असताना रुग्णांना पुरेशा सुविधा उपलब्ध होत नसल्याची खंत ढवळे यांनी बोलून दाखवली. गेल्या १५ दिवसांपासून एक्सरे विभागातील एक्सरे प्लेट नसल्याचे कारण पुढे करुन रुग्णांचे एक्सरे काढण्याचे टाळले जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी वावे परिसरासह पोलादपूर, अलिबागमधील काही रुग्ण हे एक्सरे काढण्यासाठी रुग्णालयात आले होते, मात्र एक्सरे प्लेट नसल्याचे सांगून त्यांना आठ दिवसांनी येण्याचा सल्ला ड्युटीवरील डॉक्टर आणि कर्मचाºयांनी दिला, असे ढवळे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी आलेल्या त्याच रुग्णांना तेच कारण पुढे करुन आणखी आठ दिवसांनी येण्याचा सल्ला देण्यात आल्याचे ढवळे यांनी स्पष्ट केले. अशा सर्व परिस्थितीचा विचार करता जिल्हा सरकारी रुग्णालयात नेमके काय चालले आहे, असा प्रश्न पडला आहे. जिल्ह्याच्या कानाकोपºयातून येणाºया रुग्णांना वेळेवर उपचार आणि सोयी-सुविधा उपलब्ध होत नसणे ही गंभीर बाब आहे. याबाबत लवकरच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांची भेट घेणार असल्याचे ढवळे यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी आमच्या नात्यातील एक व्यक्ती सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आली होती. त्यांना भेटण्यासाठी गेलो असता रुग्णालयाची अवस्था बिकट असल्याचे दिसून आले. स्वच्छतागृहात पुरसे पाणी उपलब्ध नव्हते, आसन व्यवस्थेतील खुर्च्या तुटलेल्या होत्या. ठिकठिकाणी कचºयाचे ढीग, अस्वच्छता असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे रुग्णांसह त्यांना भेटायला येणाºया नातेवाइकांसह ड्युटीवरील डॉक्टर, नर्स, अन्य कर्मचारी यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला असल्याचे अलिबाग येथील नागरिक रणजीत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
>रुग्णवाहिकांना अडथळा
रस्ता रुंदीकरणामध्ये जिल्हा सरकारी रुग्णालयाची जागा गेली आहे, परंतु रस्ता रुंदीकरण केल्यानंतरही त्याच रस्त्यावर खासगी रुग्णवाहिका उभ्या आहेत. रुग्णवाहिकांसह अन्य वाहनांचा सातत्याने जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीला घेराव असल्याने रुग्णालयात येणाºया १०८ रुग्णवाहिकांसह अन्य रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होत आहे.
लिफ्ट बंद
जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च होत असताना सोयी-सुविधांची पुरती दैना उडाली आहे.
दोन मजली असलेल्या इमारतीला लिफ्टची व्यवस्था सुरुवातीपासूनच केली होती, मात्र लिफ्ट कायमचीच बंद अवस्थेत असते.
अद्यापही लिफ्टचे काम न केल्याने ती बंद आहे. त्यामुळे वयोवृध्द, गरोदर महिला यांना येण्या-जाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Disadvantages of facilities in government hospitals, absence of patients due to no X-ray plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.