बस स्थानकांत प्रवाशांची गैरसोय
By Admin | Published: April 14, 2016 12:14 AM2016-04-14T00:14:05+5:302016-04-14T00:14:05+5:30
रायगड जिल्ह्यातील तळा, माणगाव, पाली या बस स्थानकांची दुरवस्था झाली आहे. या बस स्थानकांमध्ये शौचालय, पिण्याचे पाणी, प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, अस्वच्छता
रायगड जिल्ह्यातील तळा, माणगाव, पाली या बस स्थानकांची दुरवस्था झाली आहे. या बस स्थानकांमध्ये शौचालय, पिण्याचे पाणी, प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, अस्वच्छता अशा अनेक समस्या आहेत. या समस्यांकडे आगार प्रमुखांकडून लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून मूलभूत सुविधा तरी मिळाव्यात, अशी मागणी के ली जात आहे. या एसटी स्थानकात भटक्या कु त्र्यांचा वावर असून, यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. माणगाव एसटी स्थानकातून सोलापूर, धुळे, नाशिक या लांबच्या पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची मागणी होत आहे, मात्र याकडे दुलक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोपी आहे. तळा एसटी स्थाकात स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर पाली एसटी स्थानकाची इमारत मोडकळीस आली असून, छत कोसळण्याच्या घटना येथे घडत आहेत. यामुळे प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांच्याही जीवाला धोका आहे. तेव्हा या समस्या लक्षात घेऊन सोडविण्यासाठी प्रयत्न के ला जावा, अशी प्रवाशांसह परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे.
तळ्यात सुविधांची वानवा
तळा : नव्याने निर्माण झालेल्या तळा तालुक्यात एसटीबाबत अनेक समस्या असून त्या कधी सुटतील, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ७०-७५ ग्रामीण विभागातील गावांना तळा हे एकमेव मध्यवर्ती स्थानक आहे. या परिसरातील प्रवाशांना प्रवास कोठेही करावयाचा असला तरी तळा स्थानकावर येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या ठिकाणावरून दररोज १३०-१४० च्या आसपास एसटीच्या ये-जा फेऱ्या होत आहेत. अशा वेळी या स्थानकावर अनेक गैरसोयी निदर्शनास येत आहेत. त्याबाबत प्रवासीवर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानकावर पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. याबाबत अनेक वेळा चर्चा केली असता स्थानिक देणगीदार पाहून पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी, असे सांगण्यात येत असल्याची माहिती स्थानकप्रमुख जाधव यांनी दिली. स्थानकावरून दररोज शेकडो प्रवासी महिला व पुरुष प्रवास करीत असतात. अशावेळी स्थानकावर स्वच्छतागृह आणि शौचालय असणे आवश्यक आहे, परंतु ते देखील नाही. किंबहुना एसटी कर्मचारी रात्रीच्या वेळी वस्तीला असतात. त्यांनाही शौचालय नाही, आहे ते स्वच्छतागृह मोडकळीस आलेले आहे.
महिला स्वच्छतागृहाला दरवाजे देखील नाहीत. पाणी नसल्यामुळे दुर्गंधी येते. स्थानकाचे शेड प्रवाशांच्या दृष्टीने अपुरे आहे. उत्तर बाजूला मार्केटच्या बाजूने एक शेड व्हावे, अशी प्रवाशांची मागणी आहे. एसटी स्थानकाच्या आवारात डांबरीकरण होणे आवश्यक आहे. ते देखील स्थानक निर्मितीपासून आजपर्यंत झालेले नाही. स्थानकावर एक सफाई कामगार पूर्णवेळ नाही. जुनी स्थानक इमारत पाडून चार महिने झाले तरी स्थानकासमोरील दगड, माती, विटांचा ढिगारा तसाच पडून आहे.
माणगाव बस स्थानक समस्यांच्या गर्तेत
माणगाव : माणगाव एसटी डेपो १४ एप्रिल २०११ ला सुरू झाला. महाराष्ट्रातील हा एकमेव डेपो आहे, ज्याच्यासाठी पत्रकारांना उपोषण करावे लागले. या डेपोमुळे रायगड जिल्ह्यातील राजकारणात उलथापालथ झाली. मानापमानाची नाटके झाली. मात्र ५ वर्षे झाली तरी हे रोपटे बहरलेच नाही. अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे खुरटत चालले आहे. पाचच वर्षांत अनेक समस्यांनी या डेपोला घेरले आहे.
येथे अनेक पदे रिक्त असून आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. माणगाव एसटी स्थानकाचे उद्घाटन २८ मार्च १९८२ ला झाले. या कालावधीत तीन डेपो प्रमुख झाले. माणगांवच्या डेपोतून आज ३७ शेड्युल चालवली जातात. त्यासाठी ३९ गाड्या आहेत. १२ मेकॅनिक आहेत. एक टायर फिटर, ७७ चालक, ९५ वाहक आहेत. मात्र वाहतूक नियंत्रक, क्लार्क, अकाऊंटंट नाहीत. त्यासाठी १२ वाहक वापरले जातात. कर्मचारी मागितल्यास या डेपोला शासनाची मान्यता नाही असे सांगितले जाते.
माणगांव डेपोमध्ये चालक -वाहकांना विश्रांतीगृहाची दुरवस्था झाली आहे. त्यातील लाद्या उखडलेल्या आहेत. पंखे बंद आहे. खिडक्यांना दरवाजे नाहीत, पाणी खराब आहे. डेपो मागे झाडे व गवत वाढल्याने डासांचा त्रास होतो. रात्री झोप व्यवस्थित न मिळाल्याने पहाटे कामावर जाणाऱ्यांना त्रास होतो. महिलांच्या विश्रांतीगृहात ही अशीच अवस्था आहे. डेपोत असलेल्या ३९ गाड्यांपैकी काही गाड्यांच्या इंजिनमध्ये बिघाड होत असल्याने त्या रस्त्यात बंद पडतात.
येथील बस स्थानकावर २४ तास वाहतूक नियंत्रकही गरज असताना दिले जात नाहीत. माणगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे. कोकणातील पर्यटनक्षेत्रांना जोडणारे आहे. त्याची झपाट्याने वाढ होत आहे. येथून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करणे आवश्यक असताना एसटीच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली असल्याचे आमदार सुनील तटकरे यांनी केली आहे.
माणगांव एसटी आगारात प्रमाणे जिल्ह्यातील अन्य आगारातही काही पदे रिक्त आहेत. रिक्तपदे भरण्याचा निर्णय आणि प्रक्रिया केंद्रीय कार्यालयाकडून होते. रिक्त पदांचा तपशील केंद्रीय कार्यालयास कळविला आहे. येत्या काळात रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. माणगाव आगारातील विश्रामगृहाच्या दुरुस्तीचे काम लवकरच होती घेण्यात येणार असल्याची माहिती रायगड एसटी विभागीय कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
पाली बस स्थानकाच्या इमारतीची दुर्दशा
येथे उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांच्या संख्येत सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान शाळा-कॉलेज सुटण्याच्या वेळी येथे रोडरोमीओ व कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मोटारसायकली खूप संख्येने असतात. या अनधिकृत मोटारसायकल पार्र्किं गसंदर्भात पाली पोलीस ठाणे व विभागीय कार्यालय रामवाडी येथे पत्रव्यवहार केला आहे, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उलट बस स्थानकाच्या वाहतूक नियंत्रकांनाच खासगी वाहनमालकांच्या दादागिरीला सामोरे जावे लागते.
पाली बस स्थानकात शौचासाठी ग्राहकांकडून तीन रुपये घेतले जातात, परंतु तेथे वापरण्यात येणारे पाणी हे अगदी दूषित व गटारातून घेतले जाते. स्वच्छतागृहामध्ये पूर्णपणे दुर्गंधी पसरलेली आहे. बस स्थानकाच्या इमारतीची पूर्णपणे दुरवस्था झाली असून, इमारतीचे काही भाग कधीही प्रवाशांच्या अंगावरती पडून मोठी दुर्घटना होऊ शकते. यामुळे या इमारतीचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी येथील नागरिकांसह प्रवाशांकडून के ली जात आहे.