रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे गैरसोय, उद्याेग व्यवसायालाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 04:59 AM2018-07-04T04:59:22+5:302018-07-04T04:59:36+5:30
माथेरानमध्ये वर्षभर लाखो पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, मूलभूत सोयी-सुविधांअभावी पर्यटकांची गैरसोय होत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये सध्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
माथेरान : माथेरानमध्ये वर्षभर लाखो पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, मूलभूत सोयी-सुविधांअभावी पर्यटकांची गैरसोय होत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये सध्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना पायी चालणे जिकिरीचे झाले आहे.
मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या अंतर्गत वादामुळे गेल्या दोन वर्षांपासून शहरातील विकासकामे ठप्प आहेत, त्यामुळे येथील पर्यटन आणि त्यावर आधारित उद्योग व्यवसायांवरही परिणाम होत आहे. मुख्याधिकारी सागर घोलप यांनी आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला कामे दिल्याने शहरात विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांना गटाराचे स्वरूप आले आहे.
दरवर्षी नगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची धूप होऊ नये, यासाठी एक हजाराहून अधिक लहान-मोठे दगडमातीचे बंधारे बांधण्यात येतात. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर न येता गटारातून वाहते; परंतु या वेळेस ठेकेदाराने घाईघाईत सखल भागात बंधारे बांधले आहेत. तसेच रस्त्यालगत नालेसफाईही झालेली नाही, त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. रस्त्याची केलेली कामेही निकृष्ट दर्जाची आहेत. काही ठिकाणी सिमेंटचे पाइप मोºयांच्या जागी बसविण्यात आले आहेत. मात्र, ते निसटल्याने रस्ता खचून अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी घोडेस्वारीला पर्यटकांकडून पसंती दर्शवली जाते. मात्र, रस्ता खचल्याने घोड्यांनाही दुखापत होऊ शकते, त्यामुळे शहरातील रस्त्याच्या देखभालदुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
रस्त्यांच्या कामाची निविदा एप्रिल-मे महिन्यात पूर्ण करून कामे पूर्ण करणे नगरपालिका प्रशासनाचे काम आहे. गोणीद्वारे केलेले बंधारे फारकाळ तग धरू शकत नाहीत. ठेकेदाराने याबाबत गांभीर्याने घेऊन सुनियोजित पद्धतीने कामे करणे अपेक्षित आहे. घाईगडबडीत कामे पूर्ण करण्यासाठी धडपड करू नये. जेणेकरून रस्त्यांची धूप होणार नाही. रस्ते अधिक काळ कशाप्रकारे टिकतील यासाठी प्रयत्न करावेत.
- शिवाजी शिंदे, विरोधी पक्ष,
नगरसेवक माथेरान नगरपालिका