अलिबाग : अलिबाग विधानसभा मतदार संघातील शिवसेना व भाजपामधील मतभेद मिटले आहेत. आता आम्ही एकदिलाने एकत्र आलो असून, आमचा सामना शेकाप विरुद्ध असेल अशी भूमिका लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर सेना-भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अलिबागमध्ये प्रथमच घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते शिवसेनेचे सुरेंद्र म्हात्रे यांनी स्पष्ट केली आहे.अलिबाग तालुक्यात सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक मंगळवारी सकाळी झाली. सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, येत्या २८ मार्च रोजी सेना-भाजपा युतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, या वेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह उभय राजकीय पक्षांचे मान्यवर नेते उपस्थित राहाणार असल्याचे सुरेंद्र्र म्हात्रे यांनी सांगितले. या दिवशी उंडीचा भाट (कुरुळ) येथील सभागृहात उभयपक्षीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले असल्याचेही म्हात्रे यांनी पुढे सांगितले.रायगड लोकसभा मतदार संघाची ही निवडणूक सेना-भाजपाकरिता अत्यंत प्रतिष्ठेची असल्याचे भाजपाचे अॅड. महेश मोहिते यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते शिवसेनेचे सुरेंद्र म्हात्रे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय कवळे आदी उपस्थित होते.
मतभेद मिटले, आता एकदिलाने एकत्र आलो- सुरेंद्र म्हात्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:02 AM