पेण : हेटवणे धरणाच्या ओलिताखाली येणाऱ्या १७०० एकर क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या कालावधीत पिकणाºया भातशेतीसाठी कालव्यातून हेटवणे सिंचनाचे पाणी सोडले आहे. या परिसरातील जमीन पाण्याखाली आली असून, या दोन-चार दिवसांत भात पेरणीला प्रारंभ होणार आहे. यावर्षी नववर्षाच्या मुहूर्तावर पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांची कामे थोडीफार बाकी राहिली होती. ती आटोपताच शेतीसाठी पाणी सोडण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सध्या पेण शहरात व ग्रामीण भागात गुलाबी थंडी जाणवू लागली आहे, अशा थंडीत शेतीसाठी पाणी सोडल्याने सायंकाळी व रात्री वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आहे. हा गारवा आंबा व इतर फळ उत्पादनासाठी आवश्यक असतो, त्यामुळे आंबा मोहोर ताटवे फुलू लागतील. शेतजमिनीत पाणी साचल्याने एकंदर गुलाबी थंडी अधिक जाणवत आहे. सकाळी या परिसरात धुक्याची दुलई पसरते. त्यामुळे दैनंदिन कामे सूर्यप्रकाश अर्थात उन्हे पडल्यावर सुरू होत नाहीत. सध्या या परिसरात बगळे व इतर पक्ष्यांच्या आगमनाने पक्षिगणांचा किलबिलाट ऐकू येतो. शेतकरी ओल्या चिखल मातीमध्ये नांगरणी करून ओलितावर भात बियाणे भिजवून पेरणीकरून हिरवे तृणपात्याची उगवण करेल.पुढील १५ ते २० दिवस रब्बीच्या हंगामाच्या कामात शेतकरी व्यस्त राहणार असून, खरीप हंगामातील पिकांना जो फटका बसला होता, ती कसर रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करेल. उन्हाळ्यातील भातशेतीला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो, याबरोबर मुबलक पाणी व खतांची मात्रा पिकांना मिळते. खात्रिशीर उत्पन्नाची हमी व पिकांवर रोगराईची भीती नसल्याने शेतकरी सिंचनाच्या पाण्यावर होणाºया शेतीसाठी नेहमीच उत्सुक व आनंदी असतो.सिंचनाचे पाणी एप्रिल २०२० पर्यंत गरजेनुसार सोडण्यात येणार आहे. शेतकºयाची जशी मागणी असते, तसतसे पाणी कमी-जास्त प्रमाणात सोडण्यात येत असते, अशी माहिती प्रकल्प सूत्रांनी दिली. एकूणच सिंचनाचे पाणी जमिनीत सोडण्यात आल्याने येत्या महिन्याभरात येथील शिवारात शेतकरी व मजुरांची लगबग दिसून येईल. संपूर्ण शिवारात हिरवाईचा गालिचा पसरलेला दिसेल आणि येथील वातावरण प्रफुल्लित राहील.
कालव्यातून हेटवणे सिंचनाचे पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 12:58 AM