माणगाव : शेतक-यांचे विविध प्रश्न व महागाई विरोधात माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बुधवार, ४ आॅक्टोबर रोजी सकाळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत व तालुकाअध्यक्ष प्रभाकर उभारे यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार ऊर्मिला पाटील यांना निवेदन देण्यात आले.सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकºयांची सरसकट कर्जमाफीची १०० टक्के अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी. शेतकºयांना शेतीमालाचा उत्पादन खर्च व अधिक ५० टक्के नफा मिळून हमीभाव द्यावा, कृषिमालाची खरेदी करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, रब्बी हंगामासाठी शेतकºयांना पीककर्ज तातडीने देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा बुधवारी माणगावात काढण्यात आला. सकाळी ११.३० वाजता निजामपूर रोड येथून तालुका राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयापासून मोर्चाला सुरु वात झाली. हा मोर्चा माणगाव बाजारपेठेतून कचेरी रोड मार्गे तहसील कार्यालयाकडे आणण्यात आला.तहसील कार्यालयाजवळ मोर्चाला संबोधित करताना जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी सांगितले की, पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या आदेशाने १ आॅक्टोबरपासून पक्षाच्या वतीने सर्वत्र मोर्चाचे आयोजन केले गेले आहे. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भाजपा सरकारने जनतेला १५ लाख रुपये आपल्या खात्यावर जमा होतील, अशी आशा दाखवली. कोणाच्याही खात्यावर गेल्या साडेतीन वर्षांत एक रुपयाही जमा झालेला नाही. लोकहिताची कामे करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. शेतकरी संपावर गेल्यावर या सरकारने शेतकºयांच्या कर्जमाफीची घोषणा केली; परंतु प्रत्यक्षात अजूनही शेतकºयांची कर्जमाफी झालेली नाही.तालुकाध्यक्ष प्रभाकर उभारे यांनी रॉकेल, पेट्रोल, डिझेल, गॅस या साºया गोष्टी महाग झाल्या आहेत. भाजीपाल्याचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे गोरगरीब जनता आज नाराज झालेली पाहायला मिळते. शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, अशी भयानक परिस्थिती या सरकारने देशाची व राज्याची करून ठेवली असल्याचे सांगितले. या मोर्चात जिल्हा अल्पसंख्याकांचे अध्यक्ष मुक्तार वेळासकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश लाड, नगराध्यक्ष आनंद यादव, जिल्हा ओ.बी.सी. सेलचे अध्यक्ष गणेश पवार, जेष्ठ नेते राजाभाऊ रणपिसे, महादेव बक्कम, दत्तात्रेय पाटील आदी उपस्थित होते.
माणगावमध्ये राष्ट्रवादीचा मोर्चा , शेतक-यांचे प्रश्न व महागाई विरोधात असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 2:10 AM