पाटील-तटकरेंमुळे पक्षात असंतोष
By admin | Published: January 26, 2017 03:18 AM2017-01-26T03:18:15+5:302017-01-26T03:18:15+5:30
रायगड जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
अलिबाग : रायगड जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा युती केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे. शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अलिबाग तालुक्यात उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे शेकापसोबत फरफटत जाण्यापेक्षा वेगळा पर्याय निवडला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते विजय कवळे यांनी सांगितले.
हॉटेल रविकिरण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बुधवारी बोलत होते. काँग्रेसचे बॅ.ए.आर.अंतुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. दत्ता खानविलकर यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी होती. अंतुले यांनी मुख्यमंत्री असताना केवळ १८ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या विकासासह रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेतले. बॅ.अंतुले यांच्यामुळेच अलिबाग तालुक्यात आरसीएफचा प्रकल्प येऊ शकला, त्याचप्रमाणे रेवदंडा, आंबेत येथील पूल त्यांच्याचमुळे निर्माण झाले. अजून काही कालावधीसाठी ते मुख्यमंत्रीपदी विराजमान असते तर, अलिबाग-मुंबईला जोडणारा रेवस-करंजा पूलही झाला असता. अॅड. दत्ता खानविलकर यांनीही राज्यमंत्री असताना बरेच महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले, तर अलिबागचे नगराध्यक्ष असताना त्यांनी श्रीबाग ही वसाहत वसवली. दोन्ही नेत्यांनी समाजाच्या विकासासाठी काम केले, परंतु आताचे राजकारणी हे स्वत:च्या विकासासाठी झटत आहेत. यासाठी ते युत्या-आघाड्या करीत आहेत, असे सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाना साधला.
तटकरे आणि पाटील यांची राजकीय कार्यपध्दत कवळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रस्थानी होती. नेत्यांच्या अशा वागणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भरोसा राहिलेला नाही, असेही कवळे यांनी स्पष्ट केले.
शेकाप-राष्ट्रवादीला पराभव समोर दिसत असल्यानेच शेकापचे जयंत पाटील हे काँग्रेसला युतीमध्ये सामील होण्याचे आवाहन करीत आहेत. त्यापार्श्वभूमीवर अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर आणि पेणचे काँग्रेसचे माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी त्यांच्या-त्यांच्या तालुक्यात शिवसेनेसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचेही कवळे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेसोबत जाण्याचे पक्के केले.