रसायनीलाही समस्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 03:30 AM2018-04-14T03:30:58+5:302018-04-14T03:30:58+5:30
रायगड जिल्ह्यातील रसायनी हे आघाडीचे औद्योगिक क्षेत्र आहे. जवळच असलेले मुंबई महानगरी, रसायनीतून गेलेली कोकण रेल्वे, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, जवळच असलेला जुना राष्ट्रीय महामार्ग, रस्त्यांचे जाळे, पाताळगंगा नदीचे पाणी, वीजपुरवठा या सुविधांमुळे सन १९६०मध्ये या रसायनी क्षेत्रात औद्योगीकरणास सुरुवात झाली.
- बाळासाहेब सावर्डे
रसायनी/पाताळगंगा : रायगड जिल्ह्यातील रसायनी हे आघाडीचे औद्योगिक क्षेत्र आहे. जवळच असलेले मुंबई महानगरी, रसायनीतून गेलेली कोकण रेल्वे, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, जवळच असलेला जुना राष्ट्रीय महामार्ग, रस्त्यांचे जाळे, पाताळगंगा नदीचे पाणी, वीजपुरवठा या सुविधांमुळे सन १९६०मध्ये या रसायनी क्षेत्रात औद्योगीकरणास सुरुवात झाली.
एचओसी व एचआयएल या भारत सरकारच्या दोन कंपन्या १९६०-६२मध्ये येथे आल्या. आज जुन्या पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात रिलायन्स, बॉम्बे डाइंग, सिपला व एल्डर या औषध कंपन्या, बकुल, अल्कली, अमाइन्स या केमिकल्स कंपन्या आहेत. २०१२ नंतर म.औ.वि. महामंडळाने अतिरिक्त (नवीन) पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र भूखंड उपलब्ध करून देऊन विकसित केले. यात सुमारे ११० कारखाने असून, पैकी सध्या १५ कारखाने सुरू आहेत. जिंदाल स्टील, असाई विश्वा स्पेशालिटी केमिकल्स, बालाजी फॉर्मालिन, पेट्रोन्स लुब्रिकंटस, इग्लू डेअरी, मोबीज इंडिया, ओटीकर क्लॅम्स, एस.जी.फार्मा व अँटोनीबॉडी बांधणी उद्योग या नामवंत कंपन्या सुरू आहेत. मोहोपाडा येथे सेबी शेअर मार्केट व गुंतवणूक कॉलेजचे जानेवारी २०१७मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
१९९५ मध्ये जागतिकीकरण व अन्य कारणाने ओर्के पॉलिस्टर, सिद्धेश्वरी सल्फर व महाराष्ट्र शासनाचा युरिया खत प्रकल्प हे कारखाने बंद पडले. आणखी काही छोटे कारखाने बंद झाले, तरीही पाताळगंगा क्षेत्रात नवीन उद्योगांची संख्या वाढत आहे.म.औ.वि.महामंडळाने रस्ते, पाणी, वीज, भूखंड या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
पाताळगंगा व अतिरिक्त पाताळगंगा क्षेत्रातील पाताळगंगा-रसायनी इंडस्ट्रीयल असोसिएशन ( प्रिआ) ही कारखानदारांची संघटना समस्यांचा पाठपुरावा संबंधित यंत्रणेकडे करत असते. दोन्ही पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात अंदाजे २० हजार कामगार काम करत आहेत.
या क्षेत्रातही जल, वायुप्रदूषणाच्या समस्या आहेत दोन्ही पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रे व नदीपलीकडील,१० ते १२ गावांना जोडणारा पाताळगंगा नदीवरील पूल एकच व जुना आहे. त्यावरून २४ तास कंटेनर, टँकर, डंपर, ट्रक व इतर छोट्या वाहनांची वर्दळ असते. म.औ.वि. महामंडळाने पराडा कॉर्नर ते सिद्धेश्वरी कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरी काँक्रीटीकरण करून पथदिवे बसविले आहेत. नदीवर पूल अरुंद आहे, त्यावर वाहन भार अधिक आहे. वाहनतळाची सुविधा बी.ओ.टी. तत्त्वावर आहे.
>औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख समस्या
पाताळगंगा नदीवर जुन्या पुलाला जोडून नवा पूल अपेक्षित.
डंपिंग ग्राउंडची सुविधा नाही..
दाड-आपटा, पाताळगंगा ते कोन फाटा, सावरोली ते खारपाडा हे रस्ते औद्योगिक वसाहतींना जोडतात, त्यावरील खड्डे म.औ.वि.म.मंडळ भरते. हे रस्ते १२ही महिने सुव्यविस्थत अपेक्षित.
सावरोली-खारपाडा या डोंगराकडून जाणाऱ्या रस्त्यावर पोलीसचौकी अपेक्षित.
वायुगळतीसारखी परिस्थिती हाताळण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील निवासी गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची यंत्रणा असावी.
विनाखंड वीज पुरवठ्यासाठी वीज वितरणचे कर्मचारी रात्री असणे आवश्यक. सर्व कारखाने २४ तास कार्यरत प्रक्रियेतील असल्याने विनाखंड वीजपुरवठा अनिवार्य.
>जल प्रदूषण, नदीवरील पूल व डंपिंग ग्राउंड या संबंधी पाताळगंगा म.औ.वि.म.मडळाचे उपअभियंते आर. बी. बेलगमवार यांची भेट घेतली असता त्यांनी माहिती दिली.
पाताळगंगा नदीवर जुन्या पुलाला जोडून नवीन पूल बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील सामायिक सांडपाणी प्रकल्पाचे काम म.औ.वि.म.मंडळाकडे असून, प्रकल्प चालू असून सांडपाण्यावर प्रक्रि या करून ते पाणी ९ कि.मी.वर खारपाडा खाडीत सलाइन झोनमध्ये सोडले आहे. सांडपाणी प्रक्रियेतील तिसºया टप्प्यातील स्लज कारखानदार वाहतुकीने तळोजा येथे टाकतात.
डंपिंग ग्राउंडचा विषय विभागीय म.औ.वि.म.मंडळ स्तरावरचा आहे.