उरण : तालुक्यातील गव्हाणफाटा परिसरातील वाघधोंडी डोंगर परिसरात बिबट्या दिसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. येथे एका कंटेनर यार्डमध्ये काम करणाºया कामगाराला मंगळवारी बिबट्या दिसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र उरण वनविभागाचे अधिकारी शशांक कदम यांनी बिबट्यांच्या दिसण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. या परिसरात आम्ही शोध घेतला असता वेगवेगळ्या प्राण्यांच्या पायाचे ठसे आम्हाला आढळले. मात्र ते बिबट्याचेच असल्याची खात्री देता येत नसल्याचे स्पष्ट के ले.
उरण तालुक्याचा हा भाग कर्नाळा अभयारण्याच्या लगत आहे. जंगलाला लागून असल्यामुळे कर्नाळा अभयारण्यातून बिबट्या येथे येण्याची शक्यता आहे. या परिसरात पूर्वी मोर, रानडूक्कर, कोल्हे, लांडगे, तरस, ससे, रानमांजर, काळेमांजर यासारखे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आढळून यायचे. रस्त्यावरून जाणाºया बसमधील प्रवाशांना अनेक वेळा या प्राण्यांचे दर्शन होत असे. मात्र गेल्या काही वर्षात येथील डोंगर सपाट करून जंगल तोडून येथे कंटेनर यार्ड उभारले आहेत. त्यामुळे येथील वनसंपदा व वन्य जीव जवळ जवळ संपुष्टात आले आहे. कधी कधी भेकर, कोल्हा, ससा, हरण यासारखे प्राणी भरकटून किंवा पाणी आणि खाद्याच्या शोधात या भागात येत असतात. वन्यजीव संस्थाच्या सदस्यांनी अनेक वेळा असे प्राणी पकडून सुरक्षित जंगलात सोडले आहे. मार्च २०१६ मध्ये रानसई परिसरात बिबट्या आला होता. त्याचे चित्रण वनविभागाने केले होते. दोन वर्षापूर्वी चिरनेर, कळंबुसरे, पुनाडे या ठिकाणी देखिल बिबट्याला पाहिल्याचे नागरिकांनी सांगितले होते. त्यामुळे या परिसरात बिबट्या येणे हे नवीन नाही.जंगलात एकही बिबट्या आढळून आला नाही- कदमबिबट्या हा संचार करणारा प्राणी असला तरी प्रचंड रहदारी, वाहतूक यामुळे कर्नाळा अभयारण्यातून तो या परिसरात येण्याची शक्यता वनाधिकारी शशांक कदम यांनी फेटाळून लावली आहे. वनविभागाने जानेवारी महिन्यात केलेल्या एका सर्वेक्षणात उरण तालुक्यातील जंगलात अफवांव्यतिरिक्त एकही बिबट्या आढळून आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट के ले. मात्र या परिसरात आम्ही शोध घेतला असता काही प्राण्यांच्या पायासारखे ५०-६० ठसे या परिसरातील काही पाणवठ्यावर आढळून आले आहेत. मात्र, ते बिबट्याचेच आहेत याची खात्री सांगता येत नाही. तरीही खातरजमा करून घेण्यासाठी आढळून आलेले ठसे प्राणी तज्ज्ञांकडे पाठविले जाणार असल्याची माहिती कदम यांनी दिली.