भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 02:06 AM2019-11-28T02:06:14+5:302019-11-28T02:06:45+5:30

महाराष्ट्र विकास आघाडीकडून सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदांचे वाटप केले जाणार आहे.

Discussion about Bharat Gogawale getting the ministry | भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा

भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा

googlenewsNext

दासगाव : महाराष्ट्र विकास आघाडीकडून सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदांचे वाटप केले जाणार आहे. यात रायगडमधून मंत्रिपदाची संधी कोणाला मिळते याबाबत चर्चा सुरू असून, महाड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले भरत गोगावले यांचे नाव प्राधान्याने पुढे येत आहे. यामुळे महाड विधानसभा मतदारसंघात शिवसैनिक आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भरत गोगावले शिवसेनेकडून निवडणूक लढले असले तरी सत्ता स्थापन महाराष्ट्र विकास आघाडी करणार असल्याने सर्वसामान्य काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्ते आनंदित झाले आहेत. बऱ्याच वर्षाने भरत गोगावले यांच्या नावाने महाडला मंत्रिपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये दुही निर्माण झाल्याने भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. मात्र, दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली आणि राज्यात राजकीय वर्तुळातील नवे समीकरण तयार झाले. या नव्या समीकरणामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत असून, दोन वेगवेगळ्या विचार प्रवाहाचे पक्ष कसे जुळवून घेणार यात गेले काही दिवस बैठकांवर बैठका रंगल्या आहेत. या बैठकांच्या नाट्याचा अंतिम अंक आता सुरू झाला असून, राज्यात नवे सरकारची सत्ता स्थापन होणार आहे.

या सत्ता स्थापनेनंतर संपूर्ण रायगडवासीयांचे लक्ष मंत्रिमंडळ वाटपाकडे लागून राहिले आहे. रायगडमधून निवडून आलेल्या कोणाला मंत्रिपदाची संधी मिळते, याची चर्चा जागोजागी रंगली असली तरी यामध्ये महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार भरत गोगावले यांचे नाव प्राधान्याने घेतले जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप आघाडीमधील शेकापचे भाई जयंत पाटील आणि श्रीवर्धन मतदारसंघातील सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांचे नावदेखील पुढे आले आहे. मात्र, प्रशासकीय अनुभव लक्षात घेता आमदार भरत गोगावले हे विधानसभेवर सलग तीन वेळा निवडून गेलेले आमदार आहेत, यामुळे त्यांच्या नावाला आणि भाई जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.

महाड विधानसभा मतदारसंघात सन १९९० पासून शिवसेनेची सत्ता आहे. सन २००४ च्या कालावधीत शिवसेनेकडून माणिक जगताप यांनी या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विजय प्राप्त केला होता. मात्र, सन २००९ पासून पुन्हा या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवण्यात गोगावले यशस्वी झाले.
२००९ पासून पुढे सलग तीन वेळा महाड मतदारसंघात निवडून आले आहेत. यामुळे या महाराष्ट्र विकास आघाडीत भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळणे अपेक्षित आहे. संपूर्ण रायगड आणि महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले हे मंत्री व्हावेत, अशी आशा व्यक्त केली जात आहे. तर श्रीवर्धनमधून सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे या निवडून आल्या आहेत.
या महाराष्ट्र विकास आघाडीतील सुनील तटकरे हे प्रमुख निर्णायक गटात आहेत. यामुळे अदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळवून देण्यात ते उत्सुक असणार आहेत. यामुळे रायगडमध्ये दोन मंत्रिपद मिळतील, अशीही चर्चा आहे.

Web Title: Discussion about Bharat Gogawale getting the ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.