पनवेल - कोविडनंतर तब्बल ९ महिन्यांनी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व अधिकारी यांची एकत्रित बैठक गुरुवारी ज्येष्ठ नागरिक सभागृहात पार पडली. स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या बैठकीत कोरोना लसीकरण व कोरोना उपचारासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सर्वप्रथम कोरोनाचा आढावा घेत पालिकेकडे उपलब्ध असलेली संसाधनांची माहिती लोकप्रतिनिधींना दिली. लसीबाबत शासनाचे दिशानिर्देश अद्याप प्राप्त झाले नसल्याने लसीकरण कशा प्रकारे होणार आहे, याबद्दल आत्ताच सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी पालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले. यापूर्वी कोविडबाबत निर्णय घेताना प्रशासनाने लोकप्रतिनिधींना डावलले असल्याचे त्यांनी सांगितले. पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांच्या घरोघरी जाऊन पालिकेकडून फवारणी कारण्यात आली. यात किती निधी खर्च झाला? खरोखर या घरांमध्ये फवारणी झाली का? याबाबत गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित करीत पालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले.शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी कोविडबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी पालिकेला स्वतंत्र्य लॅब उभारणीची मागणी केली. राज्यात कोविडवर सर्वांत कमी खर्च करणारी पनवेल महानगरपालिका आहे. राज्य शासनाने वेळोवेळी पालिकेला निधी उपलब्ध करून दिल्याने हे शक्य झाल्याने महाविकास आघाडी सरकार पनवेलकरांच्या पाठीशी असल्याचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. या बैठकीला उपमहापौर जगदीश गायकवाड आदीं उपस्थित होते.२७ कोटींचा खर्च कोविडसाठी पालिकेला २७ कोटींचा खर्च आला. यापैकी १० कोटी यापूर्वीच पालिकेला राज्य शासनामुळे मिळाले आहेत. काही दिवसांत आणखी १० कोटी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या पुढाकाराने मिळणार असल्याचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारकडे आम्ही केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याचे म्हात्रे म्हणाले.
पनवेल पालिकेत कोरोना लसीकरणावर चर्चा, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची एकत्र बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 12:49 AM