पनवेल : खारघर शहरात पाणीसमस्येमुळे त्रस्त नागरिकांनी शेकापच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी सिडको कार्यालयावर मोर्चा काढला होता. स्थानिक नगरसेवकांकडून पाणीसमस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या वेळी रहिवाशांनी केल्यानंतर गुरुवारी परिसरातील भाजपच्या नगरसेवकांनी सिडकोच्या पाणीपुरवठा अधिकाºयाची भेट घेतली आणि वर्षभर भेडसावणाºया या समस्येवर कामयस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली.
शहरात सुमारे १५ एमएलडी पाण्याचा तुडवडा भासत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहरात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. यावर उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आले असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. याविरोधात शेकापने सिडकोच्या विभागीय कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले होते.
शहरातील रहिवासी शेकडोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. विधानसभेसाठी शेकापचे उमेदवार असलेले हरेश केणी हेदेखील आंदोलनात सहभागी झाले होते. सिडको अधिकाऱ्यांमार्फत केवळ चालढकल केली जात असल्याने केणी यांनी सिडकोचे मुख्य पाणीपुरवठा अधिकारी पी. बी. काळे यांना जाब विचारला.
मोर्चात रहिवाशांनी सत्ताधारी नगरसेवकांविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यांच्याकडून पाणीसमस्येवर योग्य पाठपुरावा केला जात नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे होते. गुरुवारी खारघरमधील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी गजानन दलाल यांची भेट घेतली व शहरातील पाणीसमस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली. शिष्टमंडळात शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, नगरसेवक नीलेश बाविस्कर, नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेविका अनिता पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, प्रभाकर जोशी, गीता चौधरी, प्रभाकर जोशी, भूषण पाटील, दिलीप जाधव उपस्थित होते.
खारघर शहराला ७५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, शहरात केवळ ६० एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याने सेक्टर ११, १२, २१, ३६, १० आदी ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा होतो. यासंदर्भात शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पाणीपुरवठा कधी सुरळीत होईल, यासंदर्भात लेखी उत्तर देण्याची विनंती पटेल यांनी पाणीपुरवठा अधिकारी दलाल यांच्याकडे केली आहे.