दूषित पाण्यामुळे तीन गावांत साथीचे आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:02 PM2020-01-11T23:02:29+5:302020-01-11T23:02:38+5:30

डोंगरी, आंबोली व एकदरा या तिन्ही गावांना आंबोली धरणातून पाणीपुरवठा होतो.

Disease of mate in three villages due to contaminated water | दूषित पाण्यामुळे तीन गावांत साथीचे आजार

दूषित पाण्यामुळे तीन गावांत साथीचे आजार

Next

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यातील डोंगरी, आंबोली व एकदरा गावात दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाबाची साथ सुरू आहे. आतापर्यंत ५० ते ६० ग्रामस्थांना साथीची लागण झाली असून दिवसागणिक ही संख्या वाढतच आहे.

डोंगरी, आंबोली व एकदरा या तिन्ही गावांना आंबोली धरणातून पाणीपुरवठा होतो. आंबोली धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून गेल्या कित्येक वर्षांत ते काढण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणातील पाण्याला दुर्गंध येत आहे. शिवाय वितरित होणारे पाणीही गढूळ असल्याने अनेकांना त्रास होऊ लागला आहे. आधी पोटदुखी आणि आता उलटी, जुलाबाने ग्रामस्थ त्रस्त आहेत. बहुतांश रुग्ण खासगी दवाखाने तसेच सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

परिसरात आगरदांडा प्राथमिक आरोग्यकेंद्र असून, ते लांब पडत असल्याने अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. साथीच्या आजाराची लागण झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून आरोग्य खात्याकडून उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असते, तर साथ इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली नसती, असे मत ग्रामस्थ मंगेश पुलेकर यांनी व्यक्त केले.

मुरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय चव्हाण यांनी डोंगरी गावात भेट देऊन तेथील पाण्याची टाकी तपासणी केली. त्याचप्रमाणे ग्रामस्थांशी संवाद साधून आवश्यक गोष्टींची पूर्तता होण्याबाबत डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून व गाळून पिण्याबाबत पत्रके काढण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे टीसीएल पावडर याचा उपयोग करण्याचे सांगण्यात आले आहे.

मुरुड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत, त्यामुळे मुरुड ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टर मिळावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.तीनही गावांत तातडीने सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णांना जास्त बाधा होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यात आले आहेत. साथ आटोक्यात असून सर्व डॉक्टर रुग्णावर लक्ष ठेवून आहेत. येथील पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
- डॉ. चंद्रकांत जगताप, तालुका आरोग्य अधिकारी

आंबोली धरणातून येणारे पाणी गढूळ व दुर्गंधीयुक्त आहे. आम्ही गावातील पाण्याची टाकी स्वच्छ केली आहे. गावात ५० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. सध्या आंबोली धरणातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून चिंचघर धरणातून पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- मच्छींद्र नाईक, अध्यक्ष, डोंगरी
 

Web Title: Disease of mate in three villages due to contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी