पर्यटकांमध्ये नाराजी : मुरुडमध्ये पर्यटन सुविधांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:17 AM2018-02-27T02:17:28+5:302018-02-27T02:17:28+5:30
कोकणातील ऐतिहासिक महत्त्वप्राप्त स्थळे ही पर्यटकांच्या आणि इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने मोठा ठेवाच मानली जातात, परंतु या इतिहासाची माहिती देणा-या साधनांची येथे वानवा असल्याने अशा ऐतिहासिक स्थळी येणा-या पर्यटक आणि अभ्यासकांना प्रत्यक्ष जागेवर पोहोचून देखील नेमका इतिहास उमजत नाही ही मोठी समस्या आहे.
जयंत धुळप
अलिबाग : कोकणातील ऐतिहासिक महत्त्वप्राप्त स्थळे ही पर्यटकांच्या आणि इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने मोठा ठेवाच मानली जातात, परंतु या इतिहासाची माहिती देणा-या साधनांची येथे वानवा असल्याने अशा ऐतिहासिक स्थळी येणा-या पर्यटक आणि अभ्यासकांना प्रत्यक्ष जागेवर पोहोचून देखील नेमका इतिहास उमजत नाही ही मोठी समस्या आहे. अशीच परिस्थिती रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा या सिद्दीच्या ऐतिहासिक संस्थानाच्या बाबतीत आहे. ऐतिहासिक स्थळे आणि परंपरा यांच्या माध्यमातून पर्यटन विकास आणि व्यावसायिक पर्यटनातून स्थानिक पातळीवरील आर्थिक विकास साध्य करण्याचे नियोजन केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावरून करण्यात आले आहे, परंतु मुरुड-जंजिºयात मात्र ते प्रत्यक्षात उतरताना दिसून येत नाही. याचबरोबर येथे अनेक पायाभूत सुविधांची वानवा आहे. यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जंजिरा अर्थात समुद्राने वेढलेला किल्ला, शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.जंजिºयाच्या पूर्वीचा मेढेकोट, त्यातील कोळी समाजाचे तत्कालीन प्रमुख राम पाटील, मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील तत्कालीन सत्तेला जुमानेसा झाला, त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची केलेली नेमणूक, अखेर मेढेकोट पिरमखानाने ताब्यात घेतला, पुढे पिरमखानाच्या जागी बुºहाणखानाची नेमणूक झाली. त्याने किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवून बांधकाम केले. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली, जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरु ष मानला जातो. इ.स.१६१७ ते इ.स.१९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा सतत अजिंक्यच राहिला. जंजिºयावर ५१४ तोफा असल्याचा इतिहासातील उल्लेख आणि सध्या अस्तित्वात असलेल्या तोफा, किल्ल्याला असलेले एकोणीस बुलंद बुरूज, ३३० वर्षे अभेद्य आणि अजिंक्य राहिलेला जंजिरा पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख नजरेसमोर येतो. अजेय जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, ३३० वर्षांनी ३ एप्रिल १९४८ रोजी हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले. अशा या इतिहासाची माहिती आज येथे येणाºया पर्यटकांना उपलब्ध व्हावी याकरिता स्थानिक नगरपरिषद, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ वा जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून सुयोग्य योजना अमलात आणणे आवश्यक आहे.
संबंधित ठिकाणी अधिकृत माहिती देणारे फलक गरजेचे आहेत. मुरुड-जंजिरा नगरपरिषदेने या संपूर्ण परिसरातील ऐतिहासिक वास्तू आणि त्यांचा इतिहास येणाºया पर्यटकांना उपलब्ध करून देण्याकरिता एखादे माहिती केंद्र सुरू केले तर ही उणीव भरून येवू शकते. मुरुड-राजपुरी मार्गावरील घाटरस्त्याची सुरक्षितता ही प्राथम्याने करणे आवश्यक आहे. पर्यटक अलिबाग व रोहा मार्गे आपल्या वाहनांनी मुरुडला पोहोचतात. मुरुड जंजिरा पर्यटनांती आगरदांड येथून सुवर्णदुर्ग शिपिंगच्या महाकाय बोटीतून आपल्या वाहनातून पलीकडे दिघी बंदरात पोहोचून पुढे श्रीवर्धन-हरिहरेश्वरला जातात वा त्याच मार्गे परत देखील येतात. या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर मुरुड, राजपुरी, आगरदांडा येथील रस्ते चांगले होणे अनिवार्य आहे.
राजपुरी गावातील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूककोंडी
मुरुड शहरातून राजपुरी बंधाºयाकडे जाणारी सर्व वाहने राजपुरी गावातील अरुंद रस्त्यावरूनच जातात. अरुंद रस्त्यांमुळे अनेकदा विशेषत: सुट्टीच्या दिवशी वाहतूककोंडी होते. शिवाय येथे अपघातांची शक्यता असते. या समस्येला विचारात घेवून या ठिकाणी एकदिशा मार्ग करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. येणारी वाहने राजपुरी मार्गे तर जाणारी वाहने खोकरी मशिद मार्गे वळवल्यास ही समस्या दूर होवू शकते.
महिला स्वच्छतागृहांची गरज
राजपुरी येथे पर्यटकांना किल्ल्यात जाणाºया बोटीसाठी थांबावे लागते. येथे पुरुषांकरिता स्वच्छतागृहाची सोय आहे, परंतु महिलांसाठी नाही. महिलांसाठी स्वच्छतागृह येथे अत्यावश्यक आहे.
अधिकृत गाइडची गरज
जंजिरा किल्ल्यात माहिती देण्याचे काम काही गाइड करतात. ते जी माहिती देतात ती अधिकृत आहे का, याबाबत पर्यटकांच्या मनात शंका निर्माण होत असते. परिणामी अधिकृत गाइड व त्यांचे अधिकृत शुल्क शासनाच्या संबंधित यंत्रणेने निश्चित करावे अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.
मुरुड-राजपुरी मार्गावर दगड कोसळण्याची भीती
मुरुडहून राजपुरीला जाणाºया घाट रस्त्याच्यावरील डोंगरावर मोठे दगड असून ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात, अशी परिस्थिती आहे. शासनाच्या संबंधित यंत्रणेने ते तत्काळ दूर करणे आवश्यक आहे, अन्यथा मोठ्या अपघाताची शक्यता आहे.
आगरदांडा आणि दिघी जेट्टीच्या रस्त्याची दुरवस्था
आगरदांडा आणि दिघी जेट्टीच्या रस्त्याची केवळ दुरवस्थाच नाही तर या दोन्ही जेट्टीपासून मुख्य रस्त्यापर्यंतचा रस्ता हा धोकादायक असून तो तत्काळ सुधारणे आवश्यक आहे. सुवर्णदुर्ग शिपिंग कंपनीच्या माध्यमातून मुरुड व म्हसळा तालुका आपल्या वाहनांसह जोडणारा हा जलमार्ग सुरू होवून किमान चार वर्षे झाली, परंतु या जंगलजेट्टीतून येणारी व जाणारी वाहने यांच्याकरिता आवश्यक रस्त्याची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप केलेली नाही.