दासगाव : महाड तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांना महाड पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने कोविड रुग्णांची माहिती संकलन कामासाठी शासन आदेशानुसार नेमले होते. मात्र, आता आम्हाला कार्यमुक्त करा, अशी मागणी माध्यमिक शिक्षकांनी महाड उपविभागीय कार्यालय आणि तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.दिवसेंदिवस वाढत असलेला कोविड प्रसार रोखण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मानवी स्थलांतर झाले आहे. शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर गावी आले आणि कोविडचा प्रसार वाढत गेला. याबाबत माहिती संकलन करण्यासाठी ३ आॅगस्टपासून महाड तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांची आरोग्य विभागात नियुक्ती करण्यात आली. महाड पंचायत समितीच्या आरोग्य विभागांतर्गत कोविड आजार कामकाज करण्यासाठी माध्यमिक शिक्षकांना आॅनलाइन कामासाठी नेमले आहे. मात्र, आता विद्यार्थ्यांनाही आॅनलाइन शिक्षण द्यावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आम्हाला कोविड कामकाज कार्यक्रमातून कार्यमुक्त करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या कामासाठी जवळपास २२ माध्यमिक शिक्षकांना नेमण्यात आले आहे. बुधवारी या शिक्षकांनी आपले निवेदन महाड उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालयात दिले. यावेळी रामसेवक रंगनाथ बडे, शहाजी अरुण बेरे, इनामदार संतोष अर्जुन, विकास विश्वास गायकवाड यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते.
कोविडच्या कामातून कार्यमुक्त करा, माध्यमिक शिक्षकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 1:21 AM