उरण : तालुक्यात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलिसांच्या कुटुंबांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र उरण पोलीस वसाहतीची अवस्था लक्षात आहे. वाढलेली झाडेझुडपांमुळे परिसरात सरपटणाºया प्राण्यांचा वावर वाढला आहे. तर सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शिवाय डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने उरण नगर परिषद हद्दीतील पोलीस वसाहतीच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. उरण तालुक्याचा झपाट्याने विकास होत आहे. औद्योगिकीकरणामुळे नागरीकरणही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच उरण पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ कामासाठी पोहचता यावे यासाठी शासनाने गृह विभागाच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली उरण नगर परिषद हद्दीतील म्हातवली - नागाव ग्रामपंचायत हद्दीजवळील भुखंडावर पोलीस वसाहतीच्या सुसज्ज इमारतीची उभारणी केली. या इमारतीचे उद्घाटन १३ आॅक्टोबर २००५ रोजी करण्यात आले.सध्या वसाहतीमध्ये १५ पोलीस कुटूंब वास्तव करीत आहेत. परंतू या कुटुंबाना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन अपयशी ठरत असल्याने रहिवाशांना त्रस्त आहेत. येथील शौचालयाच्या सेफ्टी टॅकमधील सांडपाणी रस्त्यावर आल्याने परिसरात, रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच वाढत्या झाडा झुडपांमुळे सर्पदंश, विंचूदशांची भीती व्यक्त होत आहे. वसाहतील सापांचे प्रमाण वाढले असून पोलीस कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शासनाने लवकरात लवकर पोलीस वसाहतीच्या सुशोभिकरणासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी येथील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.पोलीस वसाहतीच्या सुशोभिकरणासाठी शासन पुढाकार घेत नसल्याने या वसाहतीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पोलीस कुटुंब वसाहतीमधून स्थलांतरीत होत आहेत. स्वच्छतेअभावी परिसरात कचºयाचे, घाणीचे साम्राज्य पसरले असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
उरण पोलीस वसाहतीची दुरवस्था; सांडपाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 11:14 PM