- जयंत धुळप अलिबाग : महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील दरडग्रस्त गावांत अतिवृष्टीमुळे २००५मध्ये भूस्खलन झाले होते. या वेळी अनेक ग्रामस्थ मृत्युमुखी पडले, तर काही बेपत्ता झाले, अनेकांची राहती घरे दरडीखाली गाडली गेली होती. पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल खुर्द या दोन गावांतही भूस्खलन झाले होते. कोंढवी गावात २९ तर कोतवाल खुर्द गावात २६ कुटुंबे अशी एकूण ५५ कुटुंबे या वेळी बेघर झाली होती. या कुटुंबांची राज्य सरकारकडून तब्बल १३ वर्षे अवहेलना सुरू असून त्यांना अद्याप हक्काचे घर मिळाले नसल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या हाती आले आहे.नैसर्गिक आपत्तीनंतर रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी भास्कर वानखेडे आणि जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे तत्कालीन प्रमुख निवासी उप जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आर्थिक साहाय्य आणि मदतीचे आवाहन केले. त्यास देशातील अनेक संस्था, कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्या वेळी मुंबईतील प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक न्यासाने सहकार्याचा मोठा हात पुढे केला. पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल खुर्द या दोन गावांत प्रत्येकी १५ अशी एकूण ३० घरे अवघ्या दीड महिन्यांत बांधून दिली.कोंढवी गावात २९ आपद्ग्रस्त कुटुंबांकरिता १५ आणि कोतवाल खु. गावातील २६ आपद्ग्रस्त कुटुंबांकरिता १५ अशी घरे बांधल्यावर कोणत्या १५ आपद्ग्रस्तांना घर द्यायची, असा प्रश्न या उभय गावांमध्ये निर्माण झाला. त्या वेळी तत्कालीन महाड उप विभागीय महसूल अधिकाऱ्यांनी कोंढवी गावाकरिता लॉटरी पद्धतीने १५ कुटुंबांची निवड केली. निवडलेल्या १५ आपद्ग्रस्त कुटुंबांपैकी पाच कुटुंबे प्रारंभी त्या नव्या घरात राहायला गेली. मात्र, कालांतराने ती पुन्हा आपल्या मूळ गावात आली. सद्यस्थितीत गंगाराम काळू यादव हे एकमेव त्या १५ घरांपैकी एका घरात राहत असल्याची माहिती तहसीलदार जाधव यांनी दिली. म्हणजे उर्वरित २९ घरे १३ वर्षे विनावापर पडून आहेत आणि २८ आपद्ग्रस्त कुटुंबे आजही धोक्याच्या छायेतील कोंढवी गावातच राहत आहेत. कोतवाल खु. गावातही अशीच परिस्थिती आहे. २००५च्या अतिवृष्टी आणि भूस्खलन नैसर्गिक आपत्तीमधील पात्र आपद्ग्रस्त कुटुंबे २६ आहेत आणि श्री सिद्धिविनायक न्यासाच्या सहकार्याने बांधण्यात आलेली नवी घरे १५ आहेत. येथे देखील लॉटरी काढण्यात आली मात्र, सर्वांना एकाच वेळी घरे द्या, अशी मागणी करून आपद्ग्रस्त २६ पैकी २५ कुटुंबे नव्या घरात स्थलांतरित झाली नाहीत. केवळ रामाजी ढेबे हे एकमेव नव्या घरात राहत आहेत.>जमीन देणारे शेतकरीही मोबदल्याच्या प्रतीक्षेत१३ वर्षांत दोन्ही गावांतील ५५ कुटुंबांची सरकारच्या निष्क्रियतेमुळे अवहेलना सुरू आहे. श्री सिद्धिविनायक न्यासाने केवळ लाखो रुपये खर्चून बांधून दिलेली घरे विनावापर पडून राहिल्याने आता घरांचीही वाताहात झाली आहे.त्याचबरोबर २००५ मध्ये ही ३० घरे बांधण्याकरिता सरकारी जमीन उपलब्ध नसल्याने कोंढवी गावातील दोन, तर कोतवाल गावातील चार शेतकºयांनी आपली कसती भातशेती अत्यल्प दराने सरकारला दिली.परंतु या सहा शेतकºयांना त्यांच्या जमिनीचे सरकारी दराने मिळणारे अपेक्षित पैसे अद्याप मिळाले नसल्याचे कोतवाल खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश शिंदे यांनी सांगितले.पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल खु. या दोन्ही गावांना आजही भूस्खलनाचा धोका आहे. कोंढवी गावची ६८०, तर कोतवाल खु. गावची ७५९ लोकसंख्या असून, ग्रामस्थांनी स्थलांतरित होणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. मात्र, या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी स्थलांतरित होण्यास नकार दिला आहे. तीव्र भूस्खलन धोकाग्रस्त कोंढवी आणि कोतवाल खुर्द या दोन्ही गावांत प्रत्यक्ष जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करून, संबंधित अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे.- शिवाजी जाधव, तहसीलदार, पोलादपूर
आपद्ग्रस्त ५५ कुटुंबांची सरकारकडून १३ वर्षे अवहेलना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 2:46 AM