आदिवासी भागात पाणीपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 12:14 AM2021-03-05T00:14:42+5:302021-03-05T00:14:50+5:30
एमजीपीचे लाखोंचे पाणी बिल थकले : ग्रामस्थ आक्रमक; आश्वासनानंतर तात्पुरता पूर्ववत
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : माथेरान येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी योजनेचे लाखोंचे पाणी बिल नेरळ- माणगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या आदिवासी वाड्यांकडून थकल्याने या गावातील पाणीपुरवठा प्राधिकराणाकडून खंडित करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने काही आश्वासनांनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्याने सुरुवातीला ग्रामस्थांनी प्राधिकरणाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने नेरळ ग्रामपंचायत सदस्यांनी कोरोनाचे संकट आणि उन्हाळा तोंडा समोर असल्याने प्राधिकरणाने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपले पाणी बिल काही कालावधीत टप्प्यात भरले जातील, या अश्वासनावर हा पाणीपुरवठा पूर्ववत केला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, माथेरान पाणीपुरवठा योजनेतून पुरविण्यात येणाऱ्या नेरळ- माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील जुमापट्टी येथील तीन हजार लोकसंख्या असलेल्या सहा आदिवासी वाड्यांचा पाणीपुरवठा बिल संबंधित ग्रामपंचायतीकडून न भरल्याने प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. याबाबत प्राधिकरणाचे लाखोंचे बिल अडकल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.
यावर ग्रामस्थांनी आक्रमक होत प्राधिकरणाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत माथेरान पाणीपुरवठा योजनेसाठी आम्ही आमच्या जागा, जमिनी दिल्या असल्याचे सांगत त्या बदल्यात गावकऱ्यांना पाणी देण्याचे ठरले असतानादेखील प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला, तर यापुढे गावचा पाणीपुरवठा खंडित झाल्यास प्राधिकरणाची पाइपलाइनही आमच्या जागेतून काढण्यात येईल, असा इशारादेखील ग्रामस्थांनी दिला.
माथेरानकरांप्रमाणे
दिली बिले
प्राधिकरणाच्या माध्यमातून जे पाणी बिल देण्यात आले आहे ते पाणी बिल माथेरानकरांना देण्यात येत असलेल्या प्रकारे लावण्यात आल्याने हे बिल जास्त आहे. आम्हाला पाणी हे फिल्टर न देता सरळ उलचलेले देण्यात येत आल्याने हे पाणी बिल कमी करून देण्याची मागणीदेखील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यावेळी नेरळ ग्रामपंचयत सदस्य मंगेश म्हसकर यांनी संबंधित प्राधिकार अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपले पाणी बिल काही टप्प्यांत भरण्यात येईल, असे सांगितले.