चॉकलेटच्या बाप्पाचे दुधात विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 12:51 AM2019-09-04T00:51:15+5:302019-09-04T00:51:57+5:30
शाह कुटुंबीयांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी चक्क चॉकलेटच्या बाप्पाची स्थापना केली
वैभव गायकर
पनवेल : इको फ्रेंडली बाप्पाच्या अनोख्या संकल्पना आपल्याला दरवर्षी पाहावयास मिळत असतात. प्लॅस्टिक आॅफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याला प्रतिसाद देत पनवेलमधील शाह कुटुंबीयांनी ‘चॉकलेटचा बाप्पा’ ही अनोखी संकल्पना राबवली आहे .
शाह कुटुंबीयांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी चक्क चॉकलेटच्या बाप्पाची स्थापना केली. विशेष म्हणजे, हा बाप्पा तब्बल २० किलो चॉकलेटने बनवलेला आहे. मंगळवारी दीड दिवसाच्या या चॉकलेटच्या गणरायाचे १०० लीटर दुधात भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. दूध व चॉकलेटच्या मिश्रणाचा प्रसाद म्हणून गरिबांमध्ये वाटप करण्यात आले. पनवेलमधील संध्या सचिन शहा यांच्या संकल्पनेने हा अनोखा गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. सध्याच्या घडीला ग्लोबल वार्मिंगचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यानुसार हा अनोखा बाप्पा तयार करण्यात आल्याचे सध्या शहा यांनी सांगितले. विशेष म्हणजे, हा चॉकलेट बाप्पा मुंबईमधील सांताक्रुज या ठिकाणाहून बनवून आणला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणजे केवळ शाडूची मूर्ती बनवून त्याचे विसर्जन न करता त्यापुढे जाऊन चॉकलेट बाप्पा ही अनोखी संकल्पना राबवून विसर्जनानंतर चॉकलेट आणि दुधाच्या मिश्रणातून प्रसाद देऊन सर्वांची रजा घेणार असल्याचे शहा कुटुंबीयांनी हा उपक्र म राबवून स्पष्ट केले आहे. पारंपरिक उत्सवाचे स्वरूप बदलले असले तरी आमची बाप्पावरील श्रद्धा कायम आहे. हाच या उपक्र माचा उद्देश असल्याचे संध्या शहा यांनी सांगितले. विशेष म्हणजे, दरवर्षी विविध संकल्पना राबवून शहा कुटुंब गणेशोत्सव साजरा करीत असतात.