- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया शुक्रवार, ३ जानेवारी रोजी पार पडणार आहे. अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. शेकापकडे योगिता पारधी आणि पदीबाई ठाकरे असे दोन उमेदवार आहेत. यापैकी योगिता पारधी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची जास्त शक्यता आहे. राज्यात अस्तित्वात आलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीमध्येही शेकापही आहे. त्यामुळे या ठिकाणी आघाडीचा धर्म पाळणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ११ ते १ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, दुपारी २ वाजता उमेदवारी अर्जाची छाननी करणे, त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि गरज पडल्यास हात उंचावून निवडणूक घेणे, अशा पद्धतीने कामकाज पार पडणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे काम पाहणार आहेत.शेकापकडे योगिता पारधी (पनवेल) आणि पदीबाई ठाकरे (पनवेल) असे दोन सदस्य अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. तर काँग्रेसच्या अनसूया पादीर (कर्जत) आणि शिवसेनेच्या सहारा कोळंबे (कर्जत) असे एकूण चार सदस्य अनुसूचित जमातीचे आहेत. यापैकी कोणते उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार हे शुक्रवारीच स्पष्ट होणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेकडे प्रत्येकी एक उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचा आहे. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या वेळेला अध्यक्षपदी पेण तालुक्यातील सदस्याला संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. आरक्षण खुला प्रवर्ग अथवा ओबीसी प्रवर्गासाठी पडल्यास नीलिमा पाटील, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षण पडल्यास शेकापचे महादेव दिवेकर, दिलीप भोईर यांच्या नावाची चर्चा होती; परंतु आरक्षण अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी पडल्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणी पडले.शेकापकडे योगिता पारधी आणि पदीबाई ठाकरे असे दोन सदस्य अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. दोन्ही सदस्य हे पनवेल तालुक्यातील आहेत. अडीच वर्षांपूर्वी शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद दिले होते. त्यामुळे आता पुढील अडीच वर्षे शेकापचा अध्यक्ष विराजमान होणार, असा अलिखित ठराव आहे. या वेळी पेणला प्रतिनिधित्व देण्यात येणार होते. मात्र, आरक्षण हे अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी पडले आहे. त्यामुळे प्रस्तापित घराण्याच्या बाहेर अध्यक्षपद गेले आहे. शेकापकडे योगिता पारधी आणि पदीबाई ठाकरे असे दोन सदस्य अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. त्यामुळे पनवेलकडे अध्यक्षपद जाणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चाव्या आता पनवेल शेकापकडे जाणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.शिवसेनेकडून आदेश नाहीअध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवार उभा करण्याबाबत अद्याप काहीच आदेश आलेले नाहीत, असे रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. काँग्रेसची भूमिका जाणून घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
जि. प. अध्यक्षपदाची आज निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 1:02 AM