जिल्ह्यात साकारले सामाजिक संदेश देणारे देखावे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 01:34 AM2019-09-07T01:34:50+5:302019-09-07T01:35:23+5:30
जगाच्या नकाशावर असलेले माथेरान हे थंड हवेचे ठिकाण जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते
मोहोपाडा : नारपोली येथील रोशन शिवराम म्हस्कर यांनी आपल्या निवासस्थानी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून बनविलेला आकर्षक देखावा साकारला आहे. या देखाव्यात रोशनने सांगली-कोल्हापूर पूरग्रस्त भागात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली देत एकमेकांना सहकार्य करावे, असा संदेश दिला आहे. शिक्षणक्षेत्रात इंग्रजी माध्यमाच्या शाळांत पाल्याला शिकविण्याकडे पालकांचा कल असतो, त्यामुळे मराठी शाळांतील पटसंख्या कमी होत आहे. आपण मराठी शाळांत शिक्षण घेऊनच डॉक्टर, इंजिनीअर झालो हे आज विसरलो आहोत. यासाठी हसत खेळत मराठी शिकू या, मराठी वाचवा, तसेच स्त्रीभ्रुण हत्या थांबवा, हा संदेश देणारा देखावा रोशनने साकारला आहे.
नेरळ : जगाच्या नकाशावर असलेले माथेरान हे थंड हवेचे ठिकाण जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. नेरळ रेल्वेस्टेशनवरून माथेरानला जाण्यासाठी मिनीट्रेनने प्रवास करावा लागतो. ही मिनीट्रेन नेरळवरून सुटल्यानंतर पहिले स्टेशन लागते जुमापट्टी. हा जुमापट्टी परिसर वर्षासहलीसाठी प्रसिद्ध आहे. याच जुमापट्टी परिसराचा आणि मिनीट्रेन रेल्वेस्थानक देखावा साकारून नेरळ -टेपआळी येथे विक्रांत आहिर आणि विशाल आहिर यांनी गणेशाची सुबक मूर्तीची स्थापना केली आहे. हा देखावा भक्तांसाठी आकर्षण केंद्र बनले आहे. नेरळ शहरासह कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. घरोघरी गणपती-गौरीची स्थापना करण्यात आली आहे. थर्माकोल बंद झाल्याने अनेक ठिकाणी फुलांचे डेकोरेशन तर काही ठिकाणी देखावे साकारून गणेशमूर्ती तसेच गौरीची स्थापना करण्यात आली आहे. हेच देखावे गणेशभक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.
कोकणात गणेशोत्सवाला फार महत्त्व आहे. या काळात घरगुती गणेशासह, विविध गणेश मंडळे श्रीची स्थापना करून विविध उपक्रम राबवतात. यंदाही विविध मंडळांनी आकर्षक देखावे साकारले असून पर्यावरणपूरक अशी सजावट के ली आहे. या साकारलेल्या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला आहे, असे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.