दगड पडल्याने दरडग्रस्त भयभीत

By admin | Published: August 18, 2015 11:33 PM2015-08-18T23:33:23+5:302015-08-18T23:33:23+5:30

महाड तालुक्यातील २००५ मधील दरडग्रस्त गाव असलेल्या दासगावमध्ये सोमवारी सायंकाळी एका बंद घरावर शेजारील डोंगरावरून मोठा दगड घरंगळत आला

Distraught scared of stone collapse | दगड पडल्याने दरडग्रस्त भयभीत

दगड पडल्याने दरडग्रस्त भयभीत

Next

दासगाव : महाड तालुक्यातील २००५ मधील दरडग्रस्त गाव असलेल्या दासगावमध्ये सोमवारी सायंकाळी एका बंद घरावर शेजारील डोंगरावरून मोठा दगड घरंगळत आला. यात घराचे नुकसान झाले नसले तरी २००५ मधील दरडीची भीती ग्रामस्थांमध्ये कायम असल्याने या घटनेने ग्रामस्थ पुन्हा एकदा भयभीत झाले आहेत. प्रशासनाने याची दखल घेत गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
महाडमधील दासगाव गावातील भोईवाडा परिसरात सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास टेकडीवरून एका घरावर मोठा दगड घरंगळत आला. हा दगड घराच्या जोत्यावर अडकल्याने नुकसान झाले नाही. दासगावमध्ये ज्या ठिकाणी दरड कोसळली होती त्या स्थळापासून अवघ्या काही सेकंदाच्या अंतरावरच हे घर आहे. या ठिकाणी केवळ दगड आला असला तरी या स्थळाजवळ असलेल्या इतर दगडी तसेच मातीचा काही भाग पाऊस पडताच खाली येण्याची शक्यता आहे. हे वृत्त ग्रामस्थांनी तत्काळ महाड महसूल विभागाला दिले असता महाडचे तहसीलदार संदीप कदम यांनी तलाठी संदेश पानसरे यांना तत्काळ पाचारण केले.
२००५ मध्ये महाड तालुक्यातील तीन गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळून जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली होती. यावेळी ३५ घरे मातीखाली गाडली गेल्याने ४८ निष्पाप ग्रामस्थांना प्राण गमवावा लागला होता. गेली सात वर्षे प्रशासन या ठिकाणी लक्ष देऊन असून पावसाळ्यात सतर्क राहण्याबरोबरच स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या जातात. ज्या ठिकाणी हा दगड आला आहे त्या ठिकाणी जवळपास १५०० ग्रामस्थांची वस्ती आहे. गतवर्षी भोईवाडा परिसरात टेकडीचा काही भाग घसरला होता. यावर्षी पावसाळा कमी असला तरी दरडीची भीती लोकांच्या मनात कायम आहे. (वार्ताहर)

Web Title: Distraught scared of stone collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.