जंतनाशक मोहिमेअंतर्गत अलिबागमध्ये ५ लाख बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण
By निखिल म्हात्रे | Published: February 13, 2024 06:22 PM2024-02-13T18:22:12+5:302024-02-13T18:22:45+5:30
जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत अलिबाग शहरातील नमिता नाईक इंग्लिश मिडीयम स्कूल येथे करण्यात आला.
निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील एक वर्ष ते १९ वर्ष वयोगटातील ५ लाख १५ हजार मुलामुलींना मंगळवारी जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत अलिबाग शहरातील नमिता नाईक इंग्लिश मिडीयम स्कूल येथे करण्यात आला.
सदर जंतनाशक मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले होते. ग्रामीण भागात ५४ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच २८० आरोग्य उपकेंद्रे या ठिकाणी कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांनी सहभाग नोंदविला. तर शहरी भागामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय यांच्यामार्फतही मोहीम राबविण्यात येणार आहे. १ ते १९ वर्ष वर्ष वयोगटातील मुलांना अंगणवाड्या, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये येथे जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. ज्या मुलांना मंगळवारी जंतनाशक गोळी मिळाली नाही, त्यांना गोळी देण्यासाठी २० फेब्रुवारी रोजी मॉप-अप राऊंडच्या वेळी गोळी देण्यात येणार आहे.
जंतनाशक मोहीम शुभारंभ कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे, बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रताप शिंदे उपस्थित होते.
बालके ही देशाचे भविष्य आहेत. ते निरोगी असणे गरजेचे आहे. वैयक्तिक स्वच्छता रखण्यासोबत तसेच परिसर स्वच्छ ठेवावा. यामुळे जंतूंचा विस्तार होण्यास प्रतिबंध बसेल. जंत दोषामुळे बालकांमध्ये ऍनिमियाचा सर्वाधिक धोका उद्भवतो शिवाय आतड्यांना सूज येणे, पोटदुधी, भूक मंदावणे, उलट्या, अतिसार तसेच इतर आजार उद्भवतात. या आजारांना आळा घालण्यासाठी वर्षातून दोन वेळा बालकांनी जंतनाशक गोळी घेणे गरजेचे आहे.
-डॉ. भरत बास्टेवाडमुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.