जिल्ह्यात २४१ बालके अतिकुपोषित

By admin | Published: September 29, 2016 03:42 AM2016-09-29T03:42:29+5:302016-09-29T03:42:29+5:30

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा प्रश्न चर्चेत असताना रायगड जिल्ह्यातही २४१ अतिकुपोषित, तर ९५८ कुपोषित बालके असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

In the district, 241 children are uncultivated | जिल्ह्यात २४१ बालके अतिकुपोषित

जिल्ह्यात २४१ बालके अतिकुपोषित

Next

- कांता हाबळे, नेरळ
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा प्रश्न चर्चेत असताना रायगड जिल्ह्यातही २४१ अतिकुपोषित, तर ९५८ कुपोषित बालके असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्यातील १६ जिल्ह्यात राज्य सरकारच्या महिला बाल कल्याण विभागाची एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली. कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा यात समावेश होता. कर्जत तालुक्यातील १४७ गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र मे महिन्यात सुरू झालेली ही योजना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सहकार्य न मिळाल्याने १५ दिवसांतच बंद पडली.
योजनेनुसार कुपोषित बालके, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त आहार पुरवला जाणार होता. यात केळी, अंडी, खजूर यांचा समावेश करण्यात येणार होते. मात्र अन्न शिजवण्यासाठी निधीच नसल्याने ही योजना बंद पडल्याचे सामाजिक संस्थेने केलेल्या पाहणीत समोर आले.
आदिवासी विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग यांचा समन्वय नसल्याचा आरोप आदिवासी विभागात काम करणाऱ्या संघटनांकडून केला जात आहे. महिला व बालकल्याण विभागातील अनेक पदे सध्या रिक्त आहेत. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्यात मर्यादा येत आहेत.
कुपोषित बालकांची संख्या वाढली असली तरी, आरोग्य तपासणीत आजारी आढळलेल्या बालकांना आणि त्यांच्या मातांना संदर्भ सेवा देण्यात येत आहे. त्यांना योग्य व पूरक आहार मिळेल, यांची खबरदारी घेतली जात आहे. कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत सांगण्यात आले.

कुपोषणाची कारणे
आदिवासी विभागाकडून पोषण आहार योजनेसाठी केली जाणारी आर्थिक तरतूद ३२ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. सुरु वातीला ही तरतूद ६२ टक्के होती. मात्र सरकारी पाठपुराव्यानंतर यात ३0 टक्के घट करण्यात आली. पोषण आहार योजनेसाठी गाव, तालुका पातळीवरील समित्या अस्तित्वात नाही. अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार हा शिजवून दिला पाहिजे. मात्र पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने पोषण आहार योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे.

जिल्ह्यात १७ प्रकल्प
जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील १७ प्रकल्पांतील २,६०४ अंगणवाड्यांचे तसेच ६०४ छोट्या (मिनी) अंगणवाड्यांतील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात एकूण १ लाख ५५ हजार ७७७ बालकांची तपासणी केली. सर्वेक्षणात २४१ बालके अतिकुपोषित, ९५८ बालके कुपोषित आढळून आली. कमी वजन असलेली १,१५२ बालके आढळली. कर्जत, सुधागड पाली, पेण, खालापूर येथे कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे.

कुपोषित बालके, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त आहार पुरवला जाणार होता. यात केळी, अंडी, खजूर यांचा समावेश करण्यात येणार होते. मात्र अन्न शिजवण्यासाठी निधीच नसल्याने ही योजना बंद पडल्याचे सामाजिक संस्थेने केलेल्या पाहणीत समोर आले.

निधीअभावी प्रकल्प एकमध्ये १५ एप्रिलपासून तर प्रकल्प दोनमध्ये जुलै महिन्यापासून पोषण आहार योजना बंद आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला असून पुढील आठवड्यात ही योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
- आर.एन.सांबरे, प्रभारी अधिकारी,
एकात्मिक बालविकास प्रकल्प

पोषण आहार योजनेसाठी केली जाणारी आर्थिक तरतूद वाढवण्यात यावी, अंगणवाडी सेविकांना त्यांचे मानधन वेळच्या वेळी मिळावे. पोषण आहार मुलांना आवडेल असा असावा आणि तो गरम शिजवून द्यावा, कुपोषणमुक्तीसाठी विविध स्तरावर कार्यरत समित्यांचे तातडीने गठन व्हावे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कुपोषित बालकांच्या संगोपनासाठी स्वतंत्र कक्षांची स्थापना करण्यात यावी.
- अशोक जंगले,
सामाजिक कार्यकर्ते, कर्जत

Web Title: In the district, 241 children are uncultivated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.