जिल्ह्यात ४८ तासांत ३०१ मि.मी. पाऊस
By admin | Published: June 10, 2017 01:14 AM2017-06-10T01:14:36+5:302017-06-10T01:14:36+5:30
मृग नक्षत्रावर आगमन झालेल्या पर्जन्यराजाने जिल्ह्यात गुरुवारी दमदार हजेरी लावली असून, शुक्रवारी सकाळी संपलेल्या
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : मृग नक्षत्रावर आगमन झालेल्या पर्जन्यराजाने जिल्ह्यात गुरुवारी दमदार हजेरी लावली असून, शुक्रवारी सकाळी संपलेल्या ४८ तासांत जिल्ह्यात ३०१.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १८.८४ मि.मी. आहे. दरम्यान, जिल्ह्यात आगामी २४ तासांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (७ से.मी. ते १२ से.मी.), तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक (१२ से.मी. ते २४ से.मी.) पाऊस पडण्याची शक्यता असून, समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार असल्याने जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्कतेचा इशारा सर्वत्र दिला आहे.
अतिवृष्टीमुळे जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागाकडून आवश्यक त्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी संबंधित विभागाकडील बचाव पथक, बचाव साहित्य, रुग्णवाहिका आदी सुविधा तयार ठेवण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.
सखल भागातून पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक प्रवाहाच्या मार्गामधील अडथळे दूर करणे, आपत्कालीन प्रसंगी पर्यायी ठिकाणी स्थलांतरासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनीही आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना करण्यात आले
आहे.
मुरुडमधील मच्छीमार्केट परिसरात साचले पाणी
आगरदांडा : मुरु ड येथे गेले दोन दिवस ८५ मि.मी. पाऊस कोसळल्याने शहरातील मच्छीमार्केट परिसरातील घरासमोर दोन फुटांपेक्षा जास्त पाणी साचल्याने तेथील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या ठिकाणी परिसराला नदीचे स्वरूप आल्याने नागरिकांना या पाण्यातून येण्या-जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
मुरु ड नगरपरिषदेच्या मार्फत कोळीवाड्यात अनेक ठिकाणी गटारांच्या कामासाठी खोदकाम चालू असून ती कामे अर्धवट आहेत. ही कामे लवकरात लवकर करावी, याकरिता सागरकन्या मच्छीमार सोसायटीतर्फे निवेदन देण्यात आले. या निवेदनात जी गटारांची कामे चालू आहेत ती पाऊस पडण्याच्या आत करावी, अन्यथा पाऊस आल्याने येथे पाणी साचून घरात येऊन आर्थिक नुकसान होईल, असे सुचविले होते. मात्र, या निवेदनाकडे फारसे लक्ष न दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे व्हाइस चेअरमन तथा समाजसेवक मनोहर मकू यांनी सांगितले.