जिल्ह्यात 85 टक्के पोलिसांचे लसीकरण, रायगड पोलीस दलातील एक हजार ८३६ जणांनी घेतली कोरोनाची लस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 09:22 AM2021-03-17T09:22:44+5:302021-03-17T09:22:49+5:30
कोरोना लसीकरणासाठी शासनाने प्रत्यक्ष आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार लस उपलब्ध होताच रायगड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली.
निखिल म्हात्रे -
अलिबाग : कोरोना काळात आपली तहानभूक विसरून जनतेच्या संरक्षणासाठी तत्पर असलेल्या ८५ टक्के पोलिसांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार रायगड पोलीस दलातील तब्बल एक हजार ८३६ पोलिसांना कोरोना लस देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कोरोना लसीकरणासाठी शासनाने प्रत्यक्ष आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार लस उपलब्ध होताच रायगड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. लसीकरण सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या लसीकरण केंद्रांवर मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या लसीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू असताना पोलिसांनी दिलेला प्रतिसाद जनसामान्यांना प्रोत्साहन करणारा ठरेल असे बोलले जात आहे.
लसीकरणाचा पहिला टप्पा येत्या काही दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. व्याधी असलेल्यांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लस घेण्याचे सुचविण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य बजावत असताना ४५० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती; तर चार पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता.
जिल्ह्यात २८ पोलीस अधिकारी व ३६४ अंमलदारांचे लसीकरण बाकी आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असून, लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आल्याने पोलिसांचे मनोबल उंचावले आहे. पोलीस खात्याला नेहमी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते; परंतु कोरोना काळात पोलीस खात्याने बजावलेल्या कर्तव्यामुळे या कोविड योद्ध्यांनी जनतेच्या हृदयात स्थान मिळविले.
१५ जणांनी घेतला कोरोनाचा दुसरा डोस
जिल्ह्यातील दोन हजार ६० कर्मचाऱ्यांपैकी पहिला डोस जवळपास एक हजार ८३६ जणांनी घेतला आहे, तर त्यात १४० अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. १५ कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. उर्वरित पोलिसांचे वेळापत्रक ठरले आहे.
जिल्ह्यात १६८ पोलीस अधिकारी, तर २ हजार ६० अंमलदार आहेत. त्यापैकी १४० अधिकारी व १ हजार ६९६ अंमलदारांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे.
५० टक्के महिला पोलिसांनी घेतली लस
जिल्ह्यातील पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. जवळपास १२ टक्के महिला कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. काही जणांना अद्याप २८ दिवस पूर्ण न झाल्याने त्या प्रतीक्षेत आहेत.
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस घेतल्यानंतर आवश्यकता भासली तर त्या कर्मचाऱ्याला सुट्टी घेण्याची मुभा देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतले आहे. उर्वरित कामाचे नियोजन करून दररोज पोलीस कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे.
- अशोक दुधे, पोलीस अधीक्षक, रायगड