निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोनाच्या हाहाकाराने अवघे जग मेटाकुटीला आले आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत नागरिकांपुढे अमाप शंकांचे काहूर माजलेले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने १०७७ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. मात्र, यातील गंभीर बाब म्हणजे तुम्हाला या हेल्पलाइनवर संपर्क साधायचा असेल, तर तुमच्याकडे बीएसएनएलचा लँडलाइन अथवा बीएसएनएलचा मोबाइल क्रमांक असणे अनिवार्य आहे, अशी विचित्र अट अद्यापही नागरिकांना माहिती नाही. बीएसएनएल व्यतिरिक्त अन्य क्रमांकावरून कॉल केल्यावर तो कनेक्टच होत नसल्याने नागरिकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने या हेल्पलाइन बाबतची वस्तुस्थिती जाहीर न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.जगभरात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना आखत आहेत. कोरोनासंदर्भात नागरिकांना असलेले प्रश्न सोडविण्यासाठी हेल्पलाइन कार्यान्वित केल्या आहेत. मात्र, रायगड जिल्ह्यात सुरू असलेली १०७७ हेल्पलाइनवर फक्त बीएसएनएल धारकांचे कॉल लागत असल्याने, इतर नेटवर्कचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होत नाही. हेल्पलाइन वरून दिलेल्या माहितीवरून नागरिकांची कोरोना विषाणू संदर्भात असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न होतो. मात्र, जिल्हा प्रशासनाने या हेल्पलाइनकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना समस्या प्रशासनाकडे पोहोचविता येत नाहीत.लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी १०७७ हा हेल्पलाईनंबर सुरू करण्यात आला असून, या क्रमांकावर दिवसाला ४०० ते ४५० फोनकॉल्स येत असतात. यामध्ये सर्वाधिक कॉल हे ई-पास संदर्भात त्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रायगड जिल्हा नव्हे, तर सार जग अस्थिर झाल आहे. यामुळे नागरिकांना विविध प्रश्नांना सामोर जावे लागत आहे. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी १०७७ ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मात्र, सर्व नेटवर्कवरून या १०७७ या हेल्पलाइनचा संपर्क होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.>३०० फोनकॉल ई-पाससाठी; १५० शंका निरसनासाठीकोरोना संदर्भात घाबरू नये, यासाठी नागरिकांना मानसिक आधार व समुपदेशन देण्यासाठी सरकारने १०७७ ही हेल्पलाइन सुरू केली आहे. जिल्ह्यामध्ये रोजचा कोरोनाचा वाढता आकडा पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच आलेला गणेशोत्सव सणाला मुंबई, पुणा, ठाण्याहून नागरिक आपल्या मायदेशी परतत आहेत. आपल्या गावी प्रवास करताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी ई-पासच्या संदर्भात ३०० फोनकॉल १०७७ या हेल्पलाइन क्रमांकावर होते. तर १५० हून अधिक फोन कॉल्स हे क्वारंटाइन पिरेडमध्ये असलेल्या नागरिकांचे होते. त्यांच्या शंकांचे निरसन ही करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.>प्रशासनाने वेळीच खुलासा करणे गरजेचे होते - सचिन पाटीलहेल्पलाइन क्रमांकाची ग्रामीण भागातील नागरिकांना माहिती कशी होणार, शिवाय प्रत्येकाकाडे बीएसएनएलचे कनेक्शन असेलच असे नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच याचा खुलासा केला असता, तर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला नसता, असे रिसोर्स सेंटर फॉर ह्युमन डेव्हलपमेंटचे अध्यक्ष डॉ.सचिन पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.>केंद्र सरकारने हा हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. सर्व राज्यांमध्ये बीएसएनएल किंवा एमटीएनएल मार्फतच १०७७ हा नंबर लागतो, परंतु जिल्हा प्रशासनाने अन्य वेगळे हेल्पलाइन क्रमांक दिले आहेत. त्यावर नागरिक माहिती विचारत आहेत आणि प्रशासन त्यांच्या शंकाचे निरासन करत आहे.-निधी चौधरी, जिल्हाधिकारी,रायगड
जिल्हा प्रशासनाची १०७७ हेल्पलाइन कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:18 AM