अपंग विद्यार्थ्याला जिल्हा परिषदेकडून गाडी; समाजकल्याण विभागाने घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:55 PM2019-09-11T22:55:51+5:302019-09-11T22:55:58+5:30
नेरळ ग्रामपंचायतीमधील मोहाचीवाडी भागात राहणारा गणेश कृष्णा भोईर हा विद्यार्थी पायाने अपंग आहे.
नेरळ : रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून अपंग असलेल्या आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडी देण्याची योजना सुरू केली आहे. त्या योजनेमधून कर्जत तालुक्यातील मोहाचीवाडीमधील ११ वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला दुचाकी देण्यात आली आहे.
नेरळ ग्रामपंचायतीमधील मोहाचीवाडी भागात राहणारा गणेश कृष्णा भोईर हा विद्यार्थी पायाने अपंग आहे. मात्र त्याही स्थितीत तो अकरावीमध्ये शिक्षण घेत असून कनिष्ठ महाविद्यालयात जाण्यासाठी त्याला वाहनाची गरज होती,मात्र आर्थिक स्थिती नसल्याने कोणतेही वाहन घेणे शक्य नव्हते. गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने अपंगांसाठी योजना आणली होती. समाजकल्याण समितीचे नारायण डामसे यांनी यावर्षी या योजनेसाठी मोठा निधी ठेवला असून त्या निधीमधून यावेळी नेरळमधील अपंग विद्यार्थी गणेश कृष्णा भोईर याची निवड करण्यात आली आहे.
अपंग असूनही शिक्षणाची ओढ लक्षात घेऊन स्थानिक जिल्हा परिषद सदस्या अनुसया पादिर यांनी गणेश भोईर या विद्यार्थ्याला गाडी मिळावी यासाठी स्वत: शिफारस केली होती. रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने अपंग विद्यार्थी गणेश कृष्णा भोईर यास गाडी ताब्यात दिली आहे.