बोर्ली-मांडला/मुरुड : अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि इंडियन असोसिएशन पेडिएट्रिक सर्जन (आयपीएस) यांच्या विद्यमाने रु ग्णालयातच बाल शस्त्रक्रि या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ११ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रि या करण्यात आल्या. रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी मुंबईतील बाल अस्थिरोगतज्ज्ञ (पेडिएट्रिक आॅर्थोपेडिक सर्जन) यांना अलिबाग जिल्हा रु ग्णालयात बाल शस्त्रक्रि या शिबिरासाठी बोलाविले होते. शून्य ते अठरा वयोगटातील बालकांच्या शस्त्रक्रि या करण्याकरिता बाल रोगतज्ज्ञ आवश्यक असतात; परंतु ते सर्व जिल्हा रु ग्णालयात उपलब्ध असतात, असे नाही. म्हणून अशा व्याधिग्रस्त बालकांच्या पालकांना मुंबई-पुणे किंवा इतर ठिकाणी जाऊन उपचार घेणे गरजेचे असते. त्यामध्ये त्या बालकांच्या पालकाला आणि बालकाला होणारा मानसिक आणि शारीरिक, तसेच आर्थिक त्रास टाळण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी सांगितले. राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानांतर्गत या शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, झालेल्या दुसऱ्या शस्त्रक्रि या शिबिरात ज्येष्ठ पेडिएट्रिक आॅर्थोपेडिक सर्जन डॉ. संजय ओक, डॉ. हेमंत लाहोटी या मुंबईतील सर्जनसह भूलतज्ज्ञ डॉ. जयश्री कोरे, डॉ. मकरंद पाटील, डॉ. ए. आर. रेड्डी, डॉ. संघर्ष मोरे, यांच्या मार्फत करण्यात आल्या. एकूण ११ शस्त्रक्रिया या तज्ज्ञ डॉक्टर्सकडून करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)
जिल्हा रुग्णालयातच ११ बाल शस्त्रक्रिया यशस्वी
By admin | Published: March 23, 2017 1:38 AM