जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद; रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 11:56 PM2021-01-11T23:56:18+5:302021-01-11T23:56:56+5:30
गरोदर महिला, अपंग रुग्णांना होतोय त्रास
अलिबाग : जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सुविधा बंद असल्याने, याचा त्रास येथे रुग्णांना होत आहे. मागील पाच वर्षांपासून बंद असलेल्या दोन्ही लिफ्ट वारंवार दुरुस्ती करूनही त्या सुरळीत चालू होत नसल्याने, जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या बदलण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाची इमारत दोन मजली आहे. वरच्या मजल्यावरून चढ-उतार काढण्यासाठी या ठिकाणी २ लिफ्ट बसविण्यात आलेल्या आहेत. रुग्णांना सुलभपणे हलविण्यात यावे, यासाठी रुग्णालयाच्या इमारतीमध्ये लिफ्टची सुविधा असावी, असा नियम आरोग्य विभागाचा आहे, परंतु या नियमाला जिल्हा रुग्णालयात मात्र हरताळ फासला जात आहे. लिफ्ट सुविधा बंद असल्याने त्याचा नाहक त्रास अतिगंभीर रुग्णांना सहन करावा लागतो. अतिदक्षता कक्षामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना अनेक वेळा त्यांच्या नातेवाईकच स्ट्रेचरवरून नेत असतात, तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या गरोदर महिलांनाही पहिल्या मजल्यावर असलेल्या प्रसूतीकक्षापर्यंत जिने चढून जावे लागते. लिफ्ट बंद असल्याचा त्रास होत असल्याने, ही लिफ्ट तत्काळ सुरू करावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची दुरुस्तीही केली जाते. मात्र, तांत्रिक कारणामुळे ती पुन्हा बंद पडते. सहा महिन्यांपूर्वी या लिफ्टची दुरुस्ती करण्यात आले होती, परंतु सध्या पडत असलेल्या पावसामुळे तळमजल्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी असते, त्यामुळे बंद करण्यात आली आहे. लिफ्ट पॅसेजमधून पाणी झिरपत असल्याने शॉर्टसर्किट प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे ही लिंक बंद करण्यात आली असल्याचे कारण जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिले आहे.
शॉर्टसर्किटचा धोका
लिफ्टखाली सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. त्यामुळे शॉर्टसर्किट होण्याची भीती असल्याने धोका पत्करण्यापेक्षा दोन्ही लिफ्ट बंद करण्यात आल्या. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिक विभागाचे संपर्क साधण्यात आला असून, नवीन लिफ्ट बसविण्याची मागणी करण्यात आली आहे, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. लिफ्ट सुरू करावी, अशी मागणी वारंवार केले जात आहे.
पॅसेजमधून झिरपतेय पाणी
लिफ्ट पॅसेजमधून पाणी झिरपत असल्याने धोका निर्माण होऊ शकतो. दुरुस्तीच्या नावाखाली या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही केला जात आहे. सद्यस्थितीत अतिगंभीर रुग्णांना वरच्या मजल्यापर्यंत मिळण्यासाठी सेवेचा वापर केला जातो. हे जोखमीचे आहे, असे राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष लवेश नाईक म्हणाले.