मधुकर ठाकूरउरण: उरणमध्ये जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (२५) विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा कृषी विभागाच्या अधीक्षक उज्ज्वला बाणखेले यांच्या हस्ते झाले. पावसाच्या सुरुवातीलाच जंगल, शेताच्या बांधावर, आणि माळरानावर मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या रानभाज्या उगवतात. नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे महत्व, ओळख, आरोग्यासाठी होणारे फायदे ,औषधी गुणधर्म आणि रानभाज्यांची पाककृतीची सामान्यांनाही ओळख, माहिती व्हावी यासाठी मंगळवारी (२५) उरणमध्ये जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
उरणमधील तेरापंथी सभागृह,उरण नगरपरिषदेच्या मराठी शाळेतील महाराष्ट्र भूषण नारायण धर्माधिकारी सभागृह, उनपचे बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, चाणजे येथील आद्य क्रांतिवीर बळवंत वासुदेव फडके सभागृह आदी एकाच दिवशी चार ठिकाणी भरविण्यात आलेल्या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा कृषी विभागाच्या अधीक्षक उज्ज्वला बाणखेले यांच्या हस्ते झाले.
जिल्हा कृषी विभागाच्यावतीने पहिल्यांदाच भरविण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवात परिसरातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते. यामध्ये आदिवासींचाही समावेश होता.या आयोजित केलेल्या महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या.काही आदिवासी आणि शेतकऱ्यांनी रानभाज्या बनविण्याच्या विविध पध्दतीची माहिती करून दिली.उपस्थित नागरिक, शेतकऱ्यांनी बनविण्यात आलेल्या विविध रानभाज्यांचा आस्वाद घेत आनंद लुटला.यावेळी विविध महिला बचत गट व शेतकऱ्यांचा प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
या आयोजित रानभाज्या महोत्सवात उरण नायब तहसीलदार जी.बी.धुमाळ, उपविभागीय कृषी अधिकारी एन.व्ही.फुलसुंदर,उरण तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ नारनवर,उरण कृषी मंडळ अधिकारी किसन शिगवण आणि उरण, अलिबाग ,पेण, खालापूर, कर्जत येथील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, आदिवासी सहभागी झाले होते.