अलिबाग: ग्रामीण भागातील विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना इंग्रजी व्यवस्थित लिहिता, वाचता आणि बोलता आले पाहिजे, यासाठी नवघर जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना संगणक लॅबची भेट देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशीच मिळालेल्या या भेटीनं विद्यार्थ्यांसह पालकही सुखावले आहेत. यासाठी अरुण व कुंदन व्होरा आणि कॅप्टन आर. राव व एन. राव या दोन दाम्पत्यांनी आश्रय ट्रस्टच्या माध्यमातून पुढाकार घेतला होता. शुक्रवारी या उपक्रमाचा नवघर जिल्हा परिषदेच्या शाळेत शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी आश्रय ट्रस्टचे विश्वस्थ अरुण व कुंदन व्होरा आणि कॅप्टन आर.राव व एन. राव यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे, शाळेचा शिक्षकवृंद आणि ट्रस्टचे कार्यकर्ते उपस्थित होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी संगणकांची भेट मिळाल्याने सारे बालगोपाळ विद्यार्थी आणि त्यांचे पालक सुखावून गेले होते.शुक्रवारी शैक्षणिक वर्षाची सुरुवाच होताच या उपक्रमाचा शुभारंभ झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना त्याच्या शैक्षणिक व व्यक्तीमत्व विकासाच्या दृष्टीने मोठी संधी निर्माण झाली आहे. तर जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक प्रक्रियेस आधुनिकतेचा नवा आयाम प्राप्त झाला असल्याची भावना रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. दरम्यान शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती 90 टक्के होती. येत्या दोन दिवसात ती 100 टक्के होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
नवघर जिल्हापरिषदेच्या शाळेत आता संगणकाचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 6:14 PM