जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी दिले आठ वर्षीय बालिकेला नवजीवन
By राजेश भोस्तेकर | Published: December 4, 2023 08:57 PM2023-12-04T20:57:38+5:302023-12-04T20:57:51+5:30
आठ वर्षाच्या मुलीच्या पोटात अपेंडिसाइटिस फुटून पू तयार होऊन तिच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.
अलिबाग : आठ वर्षाच्या मुलीच्या पोटात अपेंडिसाइटिस फुटून पू तयार होऊन तिच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. मृत्यच्या दारात असणाऱ्या या आठ वर्षाच्या मुलीस जीवदान देण्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने याना यश आले. दीड तास शत्रक्रिया करून कु. प्रविका विश्वास शिंदे हिस जीवदान दिले आहे.
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील चिकलगाव, धोर्जे येथील कु. प्रविका विश्वास शिंदे, ८ वर्ष हिला दहा पंधरा दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होता आणि एक आठवड्यापासून ताप येत होता. प्रविका गेल्या रविवारी म्हसळा येथील एका खाजगी डॉक्टरकडे तपासनीस नेण्यात आले होते. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सोनोग्राफीचा सल्ला देऊन उपचार केले. खाजगी रुग्णालयात ओपीडीच्या आधारे, रुग्णाला रविवारी २६ नोव्हेंबर रोजी यु एस जी ए पी मिळाला. तिची लक्षणे कायम राहिल्याने त्यांनी म्हसळा येथील खाजगी रुग्णालयात रुग्णाची पुन्हा तपासणी केली जेथे डॉक्टरांनी सीटी स्कॅन, नॉन कॉन्ट्रास्ट सीटी ओटीपोट आणि श्रोणि घेण्याचे सुचवले. सीटी रिपोर्ट मध्ये अपेंडिसाइटिससह अपेन्डिकोलिथचे निष्कर्ष असल्याने डॉक्टरांनी नातेवाईकांना तिची प्रकृती नाजूक शस्त्रक्रिया करावी लागेल त्यामुळे चांगल्या रुग्णालयात नेण्याचे सांगितले. त्यानंतर रुग्णाला एक दिवस तेथे दाखल करण्यात आले. तिला ३० नोव्हेंबर रोजी श्रीवर्धन मधील दाखल केले त्यानंतर अलिबाग जिल्हा रुग्णालयात तातडीने रात्रीच्या सुमारास दाखल केले.
जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी पाहणी करून स्वतः तात्काळ त्या मुलीवर शस्त्रक्रिया केली. सदरची शस्त्रक्रिया हि अत्यंत गुंतागुंतीची असून त्याकरिता भूलतज्ञ यांच्या मदतीने त्या मुलीची दीड तास शस्त्रक्रिया केली. सदरच्या शस्त्रक्रियेमध्ये सुमारे ३०० ते ३५० मिली पु (घाण) तिच्या पोटातून काढण्यात आला. सध्यस्थितीत सदरची मुलगी ही धोक्याच्या बाहेर असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. कदाचित डॉक्टरांच्या जोखमीच्या हस्तक्षेपामुळे मुलीला नवजीवन मिळाले आहे. सदरची शस्त्रक्रिया यशस्वी करण्याकरिता डॉ. राजेशा के., डॉ. आनंद हेगडे, भूलतज्ञ डॉ. सुश्मिता बी व शस्त्रक्रिया गृहातील परिचारिका यांचे विशेष सहकार्य लाभले.
जिल्हाधिकारी योगेश म्हसे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्फत रुग्णालयामध्ये आवश्यक असलेल्या सोयीसुविधा अत्यावश्यक रुग्णावरील शस्त्रक्रिया व उपचार, आयसीयू, डायलेसिस, प्रसूती विभाग या रुग्णालयातील विविध विभागामध्ये झपाटयाने सुधारणा होत आहे. रुग्णालय परिसरातील स्वच्छता, रुग्णालयात येणारे रुग्ण व लाभार्थी यांना त्याच्या कामामध्ये तत्परतेने सेवा उपलब्ध करून देण्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यशस्वी ठरताना दिसून येत आहेत. त्यामुळे जनसामान्यांमध्ये, रुग्णांचे नातेवाईक व सर्व सामान्य जनतेमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने हे स्वतःच सर्जन असल्यामुळे जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे कोविड कालावधीमध्ये बंद पडलेला शस्त्रक्रिया विभाग त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक या पदाचा पदभार संभाळल्यापासून पुन्हा सुरु केला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये २०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.