रोहा : रोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या विविध प्रश्नांमध्ये स्वत: लक्ष घालणार असल्याचे आश्वासन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी पनवेल येथे आयोजित बैठकीत शिष्टमंडळाला दिले. या वेळी चव्हाण यांनी रोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या अनास्थेकडे कायम दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांना धारेवर धरले. तर रोहा शहरातील खासगी डॉक्टरांची लवकरच बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रोहा उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर्स नाहीत, स्टाफ नाही. पुरेसी औषधे नाहीत, रुग्णांना किरकोळ उपचारासाठी थेट अलिबागला पाठविले जाते. रुग्णवाहिकेची सुविधाही नेहमीच मनस्ताप देणारी ठरली आहे. दुसरीकडे विंचू, सापदंश उपचारासाठीही रुग्णांचे हाल होतात. एकंदर विविध आजारांचे डॉक्टर्स नसल्याने नागरिकांना खासगी महागड्या दवाखान्यावर अवलंबून राहावे लागते, ही परिस्थिती बदलावी यासाठी अखेर रोहा तालुका युथ फोरमने जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना साकडे घातले. उपजिल्हा रुग्णालयासंबंधी निवेदनाची दखल घेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पनवेल येथे बैठक बोलावली होती. या वेळी आ. प्रशांत ठाकूर, रोहा युथ फोरमचे सल्लागार आप्पा देशमुख, राजेंद्र जाधव, डॉ. अजित गवळी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग, हाजी कोठारी आदी उपस्थित होते.रोहा रुग्णालयात पनवेल आणि अलिबाग येथून तात्पुरती डॉक्टर पाठविण्याची व्यवस्था केली, अशी उत्तरे डॉक्टर गवळी यांनी दिली. मात्र, रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत फारसा बदल झालेला नाही. असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात रोहा युथ फोरमचे निमंत्रक रोशन चाफेकर यांनी निदर्शनास आणून दिली. यावर चव्हाण यांनी, लवकरात लवकर हा प्रश्न निकाली लावू, असे त्यांनी स्पष्ट केले.रोहा शासकीय रुग्णालयात नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. रोहा उपजिल्हा रुग्णालय असल्याने शहरासह ग्रामीण भागातील मात्र या रुग्णालयात डॉक्टरांची आठ पदे मंजूर असून त्यापैकी तीनच पदे भरलेली आहेत. मात्र, पाच पदे भरलेली नसल्याने रुग्णांची वानवा मोठ्या प्रमाणावर होते, याशिवाय औषधे बहुतांशी वेळा येथे उपलब्ध होत नाहीत. अनेक वेळा येथील डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना चिठ्ठी लिहून देतात आणि औषधे बाहेरील मेडिकलमधून खरेदी करण्यास भाग पाडतात. यावर रवींद्र चव्हाण यांना विचारले असल्यास जे डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात गोळ्या, औषधे बाहेरून आणावयास सांगतात त्यांवर कारवाई करा, असा सूचक इशारा दिला.