जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक हवालदिल; परतीचा पाऊस अन् खराब रस्त्यांचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 10:50 PM2019-10-27T22:50:18+5:302019-10-27T22:50:41+5:30
खराब रस्ते आणि निवडणुकीच्या हंगामामुळे संख्या रोडावली
अलिबाग : दिवाळी सणानिमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्टी पडल्या की, पर्यटक हे हमखास रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे वळतात. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून अधूनमधून बरसणारा परतीचा पाऊस, क्यार चक्रिवादळाचा धसका, विधानसभा निवडणुकीची धामधूम आणि जिल्ह्यातील खराब रस्त्यांमुळे पर्यटकांची संख्या रोडावल्याचे दिसून येते. पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे पर्यटनाचा हंगाम वाया जाणार असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालयांच्या सहलींवरच आता त्यांच्या व्यवसायाची मदार राहणार आहे.
रायगड जिल्ह्याची ओळख पर्यटनाचा जिल्हा अशी झाली आहे. जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरुड तालुक्यांमध्ये सर्वाधिक पर्यटक दाखल होत असतात. त्याचप्रमाणे श्रीवर्धन, माथेरान या ठिकाणीही पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. धार्मिक, ऐतिहासिक, समुद्र पर्यटन असे विविध पर्याय पर्यटकांसाठी येथे उपलब्ध आहेत. रायगड जिल्हा मुंबई, पुण्यापासून जवळ असल्यामुळे तसेच वाहतुकीचे उत्तम पर्याय उपलब्ध असल्याने जिल्ह्यात पर्यटकांचा तसा वर्षभर राबता असतो. पावसाच्या हंगामामध्ये फारसे पर्यटक या ठिकाणी फिरकत नाहीत. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय म्हणावा तसा जोर धरत नाही. त्यामुळे त्यांचे अर्थव्यस्थेचे गणित काही प्रमाणात कोलमडून पडते. पावसाळ्यामध्ये वर्षासहलीचा बेत आखलेला असतो. मात्र, यंदाच्या पावासाळी हंगामात रस्त्यांची पुन्हा एकदा दैना उडाल्याने पर्यटकांनी या ठिकाणी येण्याचे टाळले होते.
तसेच गेल्या आठ दिवसांपासून परतीचा पाऊस, क्यार चक्रिवादळाची टांगती तलवार असल्याने पर्यटक या ठिकाणी येण्यास धजावल्याचे दिसत नाहीत. त्याचप्रमाणे गेल्या महिनाभरापासून राज्य हे विधानसभा निवडणुकीच्या मूडमध्ये होते. तसेच रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची पुन्हा पुरती दैना उडालेली असल्याने खड्ड्यातील रस्त्यांवरून प्रवास करणे पर्यटकांनी टाळले आहे. त्याचाही विपरित परिणाम पर्यटन हंगामावर काही प्रमाणात झाल्याचा पर्यटन व्यावसायिकांचा सूर आहे. दिवाळीमध्ये शाळा, महाविद्यालयांना किमान १५ दिवस सुट्टी असते. त्यामुळे फिरण्यासाठीचे प्लॅनिंग केले जाते. दिवाळीनिमित्त असलेल्या सलग सरकारी सुट्टींमुळे काही प्रमाणात पर्यटक आता हळूहळू दाखल होत असल्याचे दिसत आहे. अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, किहीम, मांडवा, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर तसेच माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची संख्या आता दिसू लागली आहे.गेल्या हंगामाच्या तुलनेमध्ये ती तब्बल ६० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. समुद्रकिनारी मनोरंजनाची साधणे पुरवणाऱ्या व्यावसायिकांनीही याला दुजोरा दिला आहे.
शाळा, महाविद्यालयाच्या सहलीवरच आमची मदार- भगत
गेल्या वर्षी पर्यटनाचा चांगला हंगाम गेला होता. मात्र, आता खराब रस्ते, परतीचा पाऊस, क्यार चक्रिवादळाचे सावट आणि नुकत्याच आटोपलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे व्यवसायाला गती मिळाली नाही, असे बोट व्यावसायिक प्रकाश भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शनिवार आणि रविवार अशा सुट्टी असल्याने काही प्रमाणात पर्यटक आले आहेत. मात्र, त्यामुळे हंगामात झालेले नुकसान भरून निघणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दिवाळीच्या सुट्टी संपल्या की लगेच शाळा, महाविद्यालय यांच्या सहली मोठ्या संख्येने दाखल होतात. त्यावरच आता आमची मदार राहणार असल्याचे भगत यांनी सांगितले.