आविष्कार देसाईरायगड : हाेळी आणि त्यापाठाेपाठ येणाऱ्या धुलिवंदन सणावर काेराेनाचे सावट पडले आहे. सार्वजनिक ठिकाणी माेठ्या प्रमाणावर सण साजरे करण्यावर निर्बंध आणले आहेत. यावर्षीही विविध रंगांना मागणी घटल्याने तब्बल साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे व्यापारी चांगलेच हवालदिल झाले आहेत.
दरवर्षी हाेळी आणि धुलिवंदनाचा सण माेठ्या जल्लाेषात साजरा करण्याची परंपरा आहे; मात्र गेल्या वर्षी काेराेनाने घातलेला धुमाकूळ यावर्षीही सुरूच आहे. दिवसाला सुमारे ५०० रुग्ण सापडत असल्याने सरकारसह प्रशासानाची झाेप उडाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता बाहेर पडणे मुश्कील हाेत आहे. धुळवड साजरी करताना रंगांची उधळ करण्यात येते. यासाठी बाजारात नेहमीप्रमाणे रंग विक्रीसाठी आले आहेत. मात्र, सरकार आणि प्रशासनाने सण साजरे करण्यावर कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रंग खेळण्यासाठी काेणीच बाहेर पडणार नाही. सार्वजनिक ठिकाणी रंग खेळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारातील रंगाच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.
रायगड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मुंबई मशिद बंदर येथील बाजारातून रंग आणले जातात. त्यानंतर येथील व्यापारी घाऊक आणि किरकाेळ बाजारात त्याची विक्री करतात. बाजारामध्ये मागणी घटल्याने सुमारे साडेतीन काेटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. रंगामध्ये प्रामुख्याने नाॅन टाॅक्सीकलर हा महाग मिळताे. याचा दर साधारण किलाेला एक हजार ४०० रुपये किलाे आहे. त्याचप्रमाणे हर्बल कलर, गुलाल यांचे दर हे किलाेला सुमारे ६० ते ७० रुपये आहे. काही व्यापारी गेल्या वर्षींचा काही माल विकत आहेत, तर काहींनी नव्याने रंग विक्रीसाठी आणले आहेत.
तरुणाईचा नाराजीचा सूरकाही प्रमाणात किरकाेळ विक्री हाेत आहे; मात्र त्यातून नुकसान भरून निघणार नाही. काेराेनामुळे तब्बल ८० टक्क्यांहून अधिक रंग आणि पिचकाऱ्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. काेराेनामुळे आम्हाला मित्रमैत्रिणींसाेबत रंग खेळता येणार नाही. आता घरातच सण साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे मज्जा करता येणार नाही, अशा प्रतिक्रिया तरुणांमधून उमटत आहेत.
काेराेनाचा कहर सुरुवातीला जाणवत नव्हता त्यामुळे माेठ्या प्रमाणात माल मागविण्यात आला. आता काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकार आणि प्रशासनाने निर्बंध घातले असल्याने सर्व ठप्प झाले आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास सुमारे साडेतीन काेटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. काही किरकाेळ विक्री हाेते; मात्र माल पडून राहिल्याने नुकसान हाेणार आहे. - मनाेज भारती, व्यापारी, अलिबाग