जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी ३१ हजार ८३३ विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:57 PM2020-02-17T23:57:29+5:302020-02-17T23:57:41+5:30
सुधागड, मुरूड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि पोलादपूर येथे प्रत्येकी एक
अलिबाग : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवार, १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी एकूण ३१ हजार ८३३ विद्यार्थी आहेत. जिल्ह्यातील ४४ केंद्रांवर ही परीक्षा पार पडेल.
सुधागड, मुरूड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि पोलादपूर येथे प्रत्येकी एक, उरण, कर्जत, पेण, रोहा आणि महाड या पाच तालुक्यांत प्रत्येकी तीन, खालापूर आणि माणगाव येथे प्रत्येकी चार, अलिबाग सहा आणि पनवेल तालुक्यात नऊ अशा एकूण ४४ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहा भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीसारखे गैरप्रकार घडू नयेत, यासाठी या भरारी पथकांमार्फत लक्ष ठेवले जाणार आहे. एकाच वर्गात एकाच वेळी पाचपेक्षा जास्त विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास संबंधित पर्यवेक्षकास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर शंभर मीटरच्या परिसरात पोलीस अधिनियम ३७(१) (३) प्रमाणे पोलीस विभागाकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रांच्या परिसरातील झेरॉक्स केंद्रांवर भरारी पथकांचे लक्ष असणार आहे. सोमवारी परीक्षा केंद्रांवर बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपला आसन क्रमांक शोधण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्चदरम्यान होत असून रायगड जिल्ह्यात या परीक्षेसाठी एकूण ४० हजार ९३ विद्यार्थी आहेत. ७१
परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
आगरदांडा : मुरूड तालुक्यातील ६६७ विद्यार्थी मुरूड शहरातील सर एस. ए. हायस्कूल केंद्रावर परीक्षा देणार आहेत. नादगांव हायस्कूल, विहुर येथील मेहबूब, सर एस. ए. हायस्कूल व अंजुमन हायस्कूलचे विद्यार्थी या परीक्षेस बसणार आहेत. विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये याकरिता विशेष पथक नेमले आहे. विद्यार्थ्यांनी मोबाइल व कॉपी आणू नये, असे आवाहन केंद्रप्रमुख आर. एन. मोरे व उपकेंद्रप्रमुख बी. एस. मोरे यांनी के ले आहे.