दिवेआगर पर्यटनस्थळ बनले कासवांचे गाव, पालकमंत्र्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 08:57 AM2022-03-28T08:57:42+5:302022-03-28T08:58:55+5:30
कासव संवर्धन प्रकल्पाला चांगला प्रतिसाद
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर या प्रसिद्ध पर्यटनस्थळी आता कासव संवर्धन चळवळ रुजत आहे. दुर्मीळ होत असलेल्या ऑलिव्ह रिडले या कासव प्रजातीच्या संवर्धन दृष्टीने रविवारी कासवांच्या पिल्लांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले. कासवांच्या दुर्मीळ होत असलेल्या प्रजातींचे संवर्धन होण्यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
दिवेआगर समुद्रकिनारा हा कासवांच्या मादीला अंडी घालण्यासाठी नेहमीच सुरक्षित असलेला किनारा आहे. ६० दिवसांपूर्वी ऑलिव्ह रिडले या कासव मादीने ११८ अंडी घातली आहेत. त्याचे वनविभाग श्रीवर्धन, ग्रामपंचायत दिवेआगर, कांदळवन दिवेआगर, सह्याद्री निसर्ग संस्था यांच्या वतीने घरटी तयार करून अंड्याची जोपासना करण्यात आली. पुढे ६० दिवसांनंतर यातून बाहेर आलेल्या पिल्लांना रविवारी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये समुद्रामध्ये सोडण्यात आले.
या कासव संवर्धन प्रकल्पात दिवेआगर सरपंच उदय बापट, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, वनक्षेत्रपाल श्रीवर्धन मिलिंद राऊत, वनपाल बोर्ली पंचतन सुनील गुरव, वनरक्षक बोर्ली पंचतन दिनेश गिऱ्हाने, वनरक्षक शेख बुरान शेख इसा पर्यटक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा पहिल्यांदाच हा महोत्सव झाला.
११८ पिल्लांना समुद्रात सोडले
ज्यावेळी कासव अंड्यातून बाहेर पडून समुद्राच्या दिशेने जाण्यासाठी सक्षम होतात, त्याच वेळी हा महोत्सव भरवला जातो. कासवांना समुद्रात सोडण्याची संपूर्ण प्रकिया पर्यटकांना पाहायला मिळते. समुद्र किनारी वनविभाग तसेच ग्रामपंचायत दिवेआगर, सह्याद्री निसर्ग संस्था, कांदळवन संस्था, कासव मित्र यांच्या माध्यमातून आतापर्यंत ११८ पिल्लांना समुद्रात सोडले.
ऑलिव रिडलेची प्रजाती धोक्यात
ऑलिव रिडले या प्रजातीचे कासव काही वर्षांपूर्वी कमी झाले होते. त्यामुळे या प्रजातीच्या कासवांमध्ये वाढ व्हावी यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले समुद्र किनारी कासव संवर्धन संस्थेकडून एक मोहीम सुरू केली.
कासवांच्या काही प्रजाती दुर्मिळ होत चालल्या आहेत. यावर जनजागृती करीत दुर्मिळ प्रजांतीचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने विविध संस्था कार्य करीत आहेत. शासनाच्या वतीनेदेखील आवश्यक सहकार्य करण्यात येत आहे.
- आदिती तटकरे, पालकमंत्री