श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरला पर्यटकांची पसंती; गुलाबी थंडीत निसर्गसौंदर्याची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 11:42 PM2020-11-08T23:42:51+5:302020-11-08T23:43:06+5:30
गुलाबी थंडीत निसर्गसौंदर्याची भुरळ : व्यावसायिकांनी व्यक्त केले समाधान; वीकेंण्डला होतेय गर्दी
दिघी : विस्तीर्ण समुद्रकिनारा व पुरातन मंदिर असणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे पर्यटन कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद होते. मात्र, अनलॉकमध्ये पर्यटन व्यवसाय सुरू झाले असून, मागील आठवड्यात दिवेआगर येथील पर्यटन सुरू झाले असताना, या शनिवार रविवार सुट्टीत फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना येथील गुलाबी थंडीमुळे निसर्गसौंदर्याने भुरळ पाडलीय. त्यामुळे आता पुन्हा पर्यटकांची हळूहळू रेलचेल सुरू झाली असून, येथील व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये थंडीने जोर धरला असून, श्रीवर्धनमध्ये किमान तापमानामध्ये घसरण होऊ लागली आहे. त्यामुळे सध्या या गुलाबी थंडीमुळे येथील निसर्गसौंदर्याचा अनुभव घेताना पर्यटकांचा आनंद द्विगुणीत होत आहे. श्रीवर्धन परिसरात सायंकाळच्या वेळेस किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होऊन थंडीचे प्रमाण वाढत आहे. हीच परिस्थिती आगामी पुढील दिवसांत कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता सध्या दिवाळी पर्यटन हंगामात दिवेआगर येथे पर्यटकांची वाढ झालेली दिसून येत आहे.
गेल्या आठवडाभरापासून सर्वच भागांमध्ये तापमान दिवसेंदिवस खाली येत आहे. या महिन्यात दिवसभर ३० अंशपर्यंत गेलेलं तापमान आता सायंकाळी १० ते १५ अंश सेल्सिअसवर आले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून २५ ते २० अंशांदरम्यान तापमान राहू लागले. त्यामुळे अचानक थंडीची लाट आल्याचा अनुभव श्रीवर्धन मधील नागरिक घेत आहेत.
मुख्य रस्त्यावर सकाळी ८ वाजेपर्यंत वातावरणात धुके दिसत आहे. त्यामुळे आता राज्यभरातले पर्यटकही शहराच्या कोंडीतून बाहेर पडून कोकणातले निसर्गसौंदर्य अनुभवायला दिवेआगरची वाट धरत आहेत.