रेवदंड्यातील रस्त्यावर डबकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2015 12:45 AM2015-06-19T00:45:22+5:302015-06-19T00:45:22+5:30
अलिबाग हमरस्त्यावरील रेवदंडा बाजारपेठेत रस्ता अरुंद असल्याने दुतर्फा नाल्याची, गटारांची व्यवस्था नसल्याने बाजारपेठेत डबकी तयार झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
रेवदंडा : अलिबाग हमरस्त्यावरील रेवदंडा बाजारपेठेत रस्ता अरुंद असल्याने दुतर्फा नाल्याची, गटारांची व्यवस्था नसल्याने बाजारपेठेत डबकी तयार झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
रेवदंडा गाव आता शहरीकरणाच्या वळणावर झुकले आहे. अनेक कौलारू घरांची जागा तीन चार मजली इमारतींनी घेतली आहे. उभ्या राहिलेल्या इमारतींना रस्त्यावर गटारांची सोय उपलब्ध नसल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षीच्या ग्रामसभेत इमारतींची संख्या वाढत असल्याने गटार योजना टप्प्याटप्प्याने राबवा असा मुद्दा चर्चेने गाजला मात्र सभा संपली आणि विषयही संपला अशी स्थिती झाली. सध्या पावसाने मुसंडी मारल्याने रस्त्यावर डबकी वाढत आहे. यामुळे पादचाऱ्यांना रंगपंचमीचा अनुभव येत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने याच भागातील चौल गावच्या हद्दीत नाले तयार केले असून त्यांची स्वच्छता झालेली नाही. शिवाय त्या नाल्यांना संरक्षण कठडा किंवा दगडांची निशाणी नसल्याने या नाल्यात अपघात होण्याचे प्रकार घडले आहेत, मात्र यात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
नागाव भागात तर रस्त्यावर ओहोळ वाहतात अशी स्थिती पहावयास मिळते मात्र अनेक वर्षे उलटूनही या रस्त्याकडे व दुतर्फा नाले करण्यासाठी कोणी वाली मिळाला नाही, ही या भागाची शोकांतिका आहे. रेवदंडा शहरीकरणाकडे झुकत आहे. मात्र गटारे नसल्याने पर्जन्यवृष्टीत डासांचा हमखास प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गावातील अंतर्गत रस्ते उंच झाले, पर्यायाने मुख्य रस्त्यावरील पाण्याचे नैसर्गिक मार्ग बदलले ही बाब पाहता बाजारपेठेतील रुंदीकरणाचे अडलेले घोडे दूर झाल्यास रुंदीकरणात गटारे होतील व पाण्याचा निचरा होईल अशी येथील व्यावसायिकांना अपेक्षा आहे. (वार्ताहर)